शासन निर्णयाचे उल्लंघन करत ‘सेमी इंग्रजी अनिवार्य’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : ‘इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्ती’चे वारे वाहत असताना दुसऱ्या बाजूला ‘संपूर्ण मराठी माध्यम’ ही संकल्पनाच महाराष्ट्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सेमी इंग्रजी ‘ऐच्छिक’ स्वरूपात सुरू करावे अशी स्पष्ट तरतूद शासन निर्णयात आहे. तरीही राज्यातील अनेक जुन्या आणि नामवंत मराठी शाळांनी सेमी इंग्रजी ‘अनिवार्य’ केल्याने गणित आणि विज्ञान मराठीतून शिकण्याचा पर्यायच विद्यार्थ्यांसमोर नाही.

पालकांचा इंग्रजी माध्यमाकडील ओघ थोपवण्याच्या हेतूने काही वर्षांपूर्वी राज्यातील मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजी ही संकल्पना अस्तित्वात आली. याअंतर्गत गणित-विज्ञान विषय इंग्रजीतून शिकण्याची सोय आधी आठवीपासून, नंतर पाचवीपासून आणि आता पहिलीपासून उपलब्ध झाली. मात्र सेमी इंग्रजीबाबत निघालेल्या प्रत्येक शासन निर्णयात गणित-विज्ञान इंग्रजीतून शिकणे ‘ऐच्छिक’ असेल, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. मात्र याची दखल न घेता सरसकट सर्व तुकडय़ा सेमी इंग्रजी करण्याकडे मराठी शाळांचा कल आहे.

मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेत पूर्वी माध्यमिक स्तरावर ऐच्छिक स्वरूपात सेमी इंग्रजी होते.  मात्र काही वर्षांपूर्वी शाळेने पहिलीपासून सर्वच तुकडय़ांना गणित इंग्रजीतून शिकवण्यास सुरुवात केल्याने पाचवीला गेल्यावर पालक सेमी इंग्रजी सोडण्यास तयार होत नाहीत. परिणामी  यंदा पाचवीसाठी एकही तुकडी मराठीची उरलेली नाही.

बोरिवलीच्या बीमानगर एज्युके शन सोसायटी शाळेत पाचवीपासून ऐच्छिक सेमी इंग्रजीची सोय होती. मात्र शिक्षकसंख्या अपुरी असल्याने दोन वर्ग चालवणे कठीण जात होते. शाळेने पालकांच्या संमतीने पाचवी ते सातवीसाठी एकच वर्ग ठेवून सेमी इंग्रजी अनिवार्य केले पण बरेच विद्याथ्र्यी सेमी इंग्रजी जमत नसल्याने ते पुढच्या इयत्तेत मराठी माध्यमाचा पर्याय निवडतात. त्यामुळे पाचवी ते सातवीसाठी सेमी आणि संपूर्ण मराठी असे दोन वर्ग पुढच्या वर्षीपासून पुन्हा सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्याध्यापिका भारती तांबे यांनी सांगितले.

पूर्व प्राथमिकपासूनच पद्धत: परळच्या आर. एम. भट मराठी शाळेच्या पूर्व प्राथमिक वर्गाना आठवडय़ातून चार दिवस इंग्रजीतून आणि फक्त एक दिवस मराठीतून अध्यापन करण्याची पद्धत आहे.  चेंबूर  एज्युके शन सोसायटी शाळेच्या जाहिरातीत ‘सेमी इंग्रजीच्या धर्तीवर इयत्ता बालवर्गापासूनच गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीतून शिकवले जातील’, असे शाळेचे वैशिष्टय़ सांगण्यात आले आहे. डॉ. शिरोडकर हायस्कू लच्या माहितीपत्रकानुसार गणित व परिसर अभ्यास विषय पूर्व प्राथमिकपासूनच इंग्रजीतून शिकवले जातात.

पालकांची खंत  : सेमी इंग्रजी सुरू करताना पालक-शिक्षक संघात त्याबाबतचा ठराव मंजूर करणे आवश्यक आहे. तसा ठराव काही वर्षांपूर्वी बऱ्याच शाळांनी मंजूर करून घेतला.  मात्र नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मत विचारातच घेतले जात नाही. संपूर्ण मराठीच्या तुकडय़ाच नसल्याने पाल्याला नाइलाजाने सेमी इंग्रजीत दाखल करावे लागत असल्याची  पालकांची खंत आहे.  मयूर कदम हे पालक सांगतात, त्यांच्या मुलीसाठी प्रवेश घेण्यासाठी  चौकशी के ली. मात्र कु ठेही संपूर्ण मराठी माध्यम उपलब्ध नाही. चार दिवस इंग्रजीतून आणि एक दिवस मराठीतून ही तडजोड मराठी भाषेसाठी घातक आहे.

शाळेचे नाव (अनिवार्य सेमीच्या इयत्ता कंसात)

१.  बीमानगर एज्युके शन सोसायटी, बोरिवली (पाचवी ते सातवी)

२. उत्कर्ष मंदिर, मालाड (पहिली ते पाचवी)

३.  महात्मा गांधी विद्यालय, वांद्रे (पहिली ते चौथी)

४.  आयईएस हर्णे गुरुजी विद्यालय, वांद्रे (पहिली ते चौथी)

५. बालमोहन विद्यामंदिर, दादर (पहिली ते पाचवी)

६.  आर. एम. भट, परळ (पूर्व प्राथमिक ते दहावी)

७.  सोशल सव्‍‌र्हिस लीग, परळ (पहिली ते दहावी)

८.  डॉ. शिरोडकर हायस्कू ल, परळ (पूर्व प्राथमिक ते दहावी)

९.  चेंबूर एज्युकेशन सोसायटी, चेंबूर (पूर्व प्राथमिक ते चौथी)

१०. डॉ. यशवंतराव दोडे विद्यालय, मुलुंड (पूर्व प्राथमिक ते दहावी)

११. डी. एस. हायस्कूल, शीव (पूर्व प्राथमिक ते दहावी)

१२. आदर्श विद्यामंदिर, बदलापूर (पूर्व प्राथमिक ते चौथी)

१३. आदर्श विद्यालय, विरार (पूर्व प्राथमिक ते दहावी)

१४. मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालय, पुणे (पाचवी ते दहावी)      (पूर्वार्ध)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi medium school turned into semi english medium in maharashtra zws