प्रसाद रावकर
राणीच्या बागेतील बंगल्यात महापौर वास्तव्यास जाणार
दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याच्या आवारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा येत्या जानेवारीत होण्याची शक्यता असून तत्पूर्वी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौर बंगला रिकामा करावा लागणार आहे. प्रशासनाने महापौरांच्या निवासासाठी निवडलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) बंगल्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. मात्र आता प्रशासनासमोर नांगी टाकत शिवसेनेने महापौरांसाठी राणीच्या बागेतील बंगल्याला पसंती दर्शविली आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरीस विश्वनाथ महाडेश्वर राणीच्या बागेतील बंगल्यात रवाना होतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.
राज्य सरकारकडून महापौर बंगल्याच्या जागेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यास मंजुरी मिळाली असून महापौर बंगल्यामध्ये मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यात आली होती. स्मारकाचा भूमिपूजन समारंभासाठी जानेवारी महिन्यातील मुहूर्त निश्चित करण्यात आल्याचे समजते. विद्यमान महापौरांच्या वास्तव्यासाठी पालिका प्रशासनाने राणीच्या बागेतील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्याची निवड केली होती. प्रशासनाने या बंगल्याची डागडुजीही केली. मात्र हा बंगला महापौरपदासाठी साजेसा नसल्याचे कारण पुढे करीत शिवसेनेने त्यास विरोध केला होता. महापौरांच्या वास्तव्यासाठी मलबार हिल येथील जल अभियंत्यांचा बंगला उपलब्ध करावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने काही ठिकाणच्या रिकाम्या भूखंडावर महापौरांसाठी नवा बंगला बांधण्याची तयारी दर्शवली होती. तसेच महापौरांना या भूखंडाची यादी पाठविल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र प्रशासनाने महापौरपदाला साजेसे निवासस्थान उपलब्ध न केल्यास आपण घरी वास्तव्यासाठी जाऊ, असा इशारा महाडेश्वर यांनी दिला होता. तसेच प्रशासनाकडून भूखंडाबाबतची कोणतीही यादी मिळालेली नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले होते.
अखेर मंगळवारी महापौर बंगल्यात झालेल्या बैठकीत स्मारकाचे भूमिपूजन जानेवारीत करण्याचे निश्चित झाले. त्यामुळे महापौरांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला. महापौरांसाठी राणीच्या बागेतील बंगल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात उभारण्यासाठी आवश्यक ती परवानगी मिळाली आहे. स्मारकाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात येणाऱ्या बंगल्यात आपण वास्तव्यास जाण्यास तयार आहोत. स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यापूर्वी शिवाजी पार्क येथील बंगला रिकाम करण्यात येईल आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या निवासस्थानात आपण वास्तव्यास जाऊ.
– विश्वनाथ महाडेश्वर, महापौर