मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) १ ते ३ एप्रिलदरम्यान घेण्यात आलेल्या व्यवस्थापन पदव्युत्तर (एमबीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत २८ प्रश्न चुकीचे होते. त्याबाबत विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या हरकतीनंतर सीईटी कक्षाने चुकीच्या प्रत्येक प्रश्नामागे एक गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमबीएच्या विद्यार्थ्यांना २८ गुण मिळणार आहेत.

सीईटी कक्षाने १ ते ३ एप्रिलदरम्यान एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेतली होती. तीन दिवस एकूण सहा सत्रात ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत सहाही सत्रांमध्ये मिळून विद्यार्थ्यांना २८ चुकीचे प्रश्न आले होते. एमबीएच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिकांवर सीईटी कक्षाने विद्यार्थ्यांना २८ ते ३० एप्रिलदरम्यान हरकती आणि तक्रारी नोंदविण्यासाठी मुदत दिली होती. त्यावर राज्यभरातून जवळपास २५३ हरकती विद्यार्थ्यांनी नोंदविल्या होत्या. यामध्ये १०१ प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी हरकती मांडल्या. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारींबाबत सीईटी कक्षाने शहानिशा केली. त्यानुसार तीन बॅचेसमधील जवळपास २८ प्रश्नांमध्ये चुका आहेत. त्यानंतर सीईटी कक्षाने या चुकीच्या प्रश्नांसाठी प्रत्येक प्रश्नामागे त्या बॅचेसमधील प्रत्येक विद्यार्थ्याला एक गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सहा प्रश्नांसाठी सीईटी सेलने उत्तरपत्रिका अपडेट केली आहे. या त्रुटींमुळे संबंधित सत्रांमध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येकाला त्या-त्या चुकीच्या प्रश्नासाठी एक अतिरिक्त गुण दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असला तरी यापूर्वी एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटातील अखेरच्या दिवशी झालेल्या परीक्षेतील २१ चुकीच्या प्रश्नानंतर आता एमबीए अभ्यासक्रमाचे प्रश्न चुकल्याने सीईटी कक्षाकडून तयार करण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेबाबत प्रश्न उभे राहिले आहेत.

विद्यार्थ्यांनी मांडल्या १०१ प्रश्नावर हरकती

हरकती आणि तक्रारी नोंदविण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये १०१ प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी हरकती मांडल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी १३४ तक्रारी लॉजिकल रिझनिंगच्या प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी नोंदविल्या होत्या. त्यात अबस्ट्रॅक्ट रिझनिंगच्या २१ तक्रारी, क्वांटीटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या ३५ तक्रारी, व्हर्बल ॲबिलिटीच्या ३५ तक्रारी होत्या.