मुंबई : शहरातील गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आता गोवरचे रुग्ण सापडणाऱ्या अतीधोकादायक ठिकाणांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये आठ प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला होता, मात्र आता ही संख्या ११ वर पोहचली आहे. त्यामुळे गोवरने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
मुंबईमध्ये ऑक्टोबरपासून गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. सुरुवातीला गोवंडी, चेंबूर, कुर्ला, मालाड, माटुंगा, भायखळा, दादर आणि सांताक्रुझ या भागांमध्येच गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. गोवरच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या आठही प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याचे महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार या प्रभागातील गोवरला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणावर भर देत नियमित, तसेच अतिरिक्त लसीकरण सत्रास सुरुवात करण्यात आली. मात्र मागील काही दिवसांमध्ये गोवरचा उद्रेक होणाऱ्या प्रभागांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. आजघडीला मुंबईतील ११ प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी, चेंबूर, कुर्ला, मालाड, माटुंगा, भायखळा, दादर आणि सांताक्रुज या आठ ठिकाणाबरोबरच आता भांडुप, प्रभादेवी आणि अंधेरी पूर्व या तीन प्रभागांमध्ये गोवरच्या रुग्णसंखेत वाढ झाली आहे. प्रभादेवी आणि अंधेरी पूर्व या दोन प्रभागांमध्ये तीन वेळा, तर भांडुप प्रभागामध्ये दोन वेळा गोवरचा उद्रेक झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : सागरी किनारा मार्गाचा ‘सल्ला’ महागला; सल्लागाराचे शुल्क ३४ कोटींवरून ५० कोटींवर
मुंबईतील गोवरच्या रुग्णसंख्येबरोबरच गोवरने मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. सलग चार दिवस गोवरने रुग्णांचा बळी घेतला आहे. गोवरची वाढती संख्या पाहता मुंबई महानगरपालिकेने या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत लसीकरणाची नियमित ९६० तर अतिरिक्त १६७५ सत्रे भरवली आहेत. गोवरचा उद्रेक वाढत असल्यामुळे महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
उद्रेक कसा ठरवण्यात येतो
एखाद्या प्रभागामध्ये सापडलेल्या गोवरच्या पाच संशयित रुग्णांपैकी दोघांना गाेवरचे निदान झाल्यास त्या प्रभागामध्ये गोवरचा उद्रेक झाला असे समजले जाते. मुंबईमध्ये आतापर्यंत ११ प्रभागामध्ये १३८ वेळा गोवर उद्रेक झाला आहे.
ऑक्टोबरपासून मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत असलेले उद्रेक झालेले आठ विभाग होते. मात्र त्यात वाढ होऊन ११ झाले आहेत. या विभागामध्ये गोवर रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्वेक्षणातून गोवरचे रुग्ण शोधण्यात येत आहेत. रुग्णांसाठी ३३० खाटा, अतिदक्षता विभाग, जीवन रक्षक प्रणाली व प्राणवायू उपलब्ध करण्यात आले आहेत.
– डॉ. मंगला गोमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगरपालिका