उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी, १२ मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर दिवसा तर पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण आणि ठाणे दरम्यान धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी चार असा पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
यामुळे ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरील प्रवाशांना ठाणे आणि डोंबिवली स्थानकावरून उलट दिशेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जलद मार्गावरील दोनही दिशेकडे उपनगरी गाडय़ांना त्यांच्या नियमित थांब्यांव्यतिरिक्त कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
हार्बर मार्गावर वांद्रे ते वडाळा रोड दरम्यान दोन्ही दिशेने तर सीएसटी ते कुर्ला दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० दरम्यान मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे वांद्रे ते सीएसटी दरम्यानची वाहतूक पूर्ण बंद राहणार असून सीएसटी ते कुर्ला दरम्यान मेन लाइनने गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.
या गाडय़ा चिंचपोकळी आणि करीरोड या स्थानकांवर थांबणार नाहीत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेन लाइन तसेच पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात आला नसून रविवारी मध्यरात्री १२.५० ते पहाटे ४.५० या काळात बोरिवली ते भाइंदर दरम्यान धीम्या मार्गावर दोन्ही दिशेने ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सर्व उपनगरी गाडय़ा बोरिवली ते विरार दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega block on all local train routes