‘मेट्रो २ अ’ (दहिसर – डी. एन. नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर – अंधेरी) मार्गिकांच्या माध्यमातून महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडला (एमएमएमओसीएल) चालू आर्थिक वर्षात तब्बल १०० कोटी रुपये महसूल अपेक्षित असून आतापर्यंत एमएमएमओसीएलच्या तिजोरी यापैकी ७० कोटी रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, तिकीट विक्रीव्यतिरिक्त जाहिराती आणि अन्य स्रोतांद्वारे ‘एमएमएमओसीएल’ला पुढील १५ वर्षांमध्ये १५०० कोटी रुपये उतपन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नव्या वर्षातही मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कसारा, खोपोली मार्गांवर वाढीव फेऱ्यांची शक्यता धूसर

मेट्रो मार्गिकेसाठी तिकीट विक्री हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र तिकीट विक्रीतून अपेक्षित महसूल मिळत नसल्याने देशभरातील मेट्रो मार्गिका तोट्यात आहेत. परिणामी, एमएमएमओसीएलमे महसूल वाढविण्यासाठी इतर स्रोतांचा शोध घेतला असून मेट्रो गाड्या, स्थानक, मेट्रो मार्गिकेच्या खांबावर जाहिरातीचे अधिकार खासगी कंपन्यांना देण्यात आले आहेत. स्थानकांच्या नावाचे अधिकार खासगी कंपन्यांना देण्यात आले आहेत. ‘एमएमएमओसीएल’ला या माध्यमातून एका वर्षासाठी १०० कोटी रुपये महसूल मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षात त्यापैकी ७० कोटी रुपये एमएमएमओसीएलच्या तिजोरीत जमा झाले असून उर्वरित ३० कोटी रुपये लवकरच तिजोरीत जमा होतील, अशी अपेक्षा आहे. तसेच जाहिराती आणि स्थानकांच्या नावाच्या अधिकारीपोटी पुढील १५ वर्षांमध्ये ‘एमएमएमओसीएल’ला १५०० कोटी रुपये महसूल मिळेल, अशी माहिती मुंबई ‘एमएमएमओसीएल’मधील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- ‘ठाण्यातील प्रकल्पांना गती द्या’; खासदार श्रीकांत शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना

या दोन्ही मार्गिकांदरम्यानच्या ३० स्थानकांवरील ८० हजार चौरस फूट जागा भाड्याने देण्यात आली आहे. यातील १७ हजार ५०० चौरस फूट जागा एकट्या अंधेरी स्थानकातील आहे. ही जागा विविध प्रकारच्या गाळेधारकांना भाड्याने देण्यात आली आहे. स्थानकांच्या नावाचे अधिकार आणि मोबाइल टॉवरसाठी जागा देऊन उत्पन्न मिळविण्यात आले आहे. ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला अद्याप प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न कमी आहे. इतर स्रोतांमधून मिळणारा महसूल ‘एमएमएमओसीएल’साठी महत्त्वाचा ठरला आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर महसूल मिळविणारा भारतातील पहिला सर्वात छोटा मार्ग असल्याचा दावा ‘एमएमएमओसीएल’कडून करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro 2a and metro 7 is 1st highest grossing short route in the country mumbai print news
First published on: 04-10-2022 at 16:21 IST