म्हाडाच्या लॉटरीचे बनावट संकेतस्थळ बनविणाऱ्या २७ वर्षीय बी.टेक. अभियंत्यास सायबर सेल पोलीस ठाण्याने अटक केली. म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनवून त्यावर गुगलकडून जाहिराती मिळवून तो आठवडय़ाला दीड लाख रुपये कमवत होता. विशेष म्हणजे त्याने विविध राज्यांच्या गृहनिर्माण आणि इतर संस्थांची तब्बल ७० संकेतस्थळे बनविली होती.
म्हाडाने मुंबईत स्वस्त घरांसाठी जाहिरात काढली होती. त्यासाठी म्हाडाने अर्ज करण्यासाठी लॉटरीचे संकेतस्थळही सुरू केले होते. मात्र म्हाडा लॉटरीचे एक बनावट संकेतस्थळ कार्यरत असल्याचे म्हाडाच्या लक्षात आले आणि त्यांनी सायबर सेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करून बीकेसी सायबर सेल पोलीस ठाण्याने हरयाणातील बी.टेक. असलेल्या एका अभियंत्यास अटक केली. त्याच्या अन्य एका साथीदाराची चौकशी सुरू असून तो दिल्लीतील पोलीस उपनिरीक्षकाचा मुलगा आहे. जे संकेतस्थळ सर्वाधिक पाहिले जाते त्या संकेतस्थळावर गुगल जाहिरात देते. आणि प्रत्येक क्लिकमागे संकेतस्थळाच्या मालकास शंभर रुपयांतील ६८ रुपये मिळतात. त्यामुळे म्हाडाचे हे बनावट संकेतस्थळ बनवून या आरोपीने एका आठवडय़ात गुगलकडून तब्बल दीड लाख रुपयांची कमाई केली होती, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) के. एम. एम. प्रसन्ना यांनी सांगितले.
अतिहुशारी नडली..
संबंधित तरुणाने गेल्या वर्षीहीा म्हाडाचे अशाच पद्धतीने बनावट संकेतस्थळ उघडून लाखो रुपये कमविले होते. दोन दिवसांपूर्वी म्हाडाच्या बनावट संकेतस्थळाबाबत गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्याला वर्तमानपत्रातून समजली. त्यामुळे आपण मुंबईत जाऊन पोलिसांची दिशाभूल करू असे त्याला वाटले आणि तो गुरुवारी सकाळी मुंबईत आला. विमानतळावरूनच त्याने बीकेसी पोलिसांना संपर्क केला आणि पोलीस ठाण्यात गेला. आम्ही यापूर्वीच त्याच्या मागावर होतो. पण तो आयताच आमच्याकडे आला आणि आम्ही त्याला अटक केली, अशी माहिती सायबर सेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी दिली. तो ७० बनावट संकेतस्थळे बनवून घरबसल्या लाखो रुपये कमवत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2015 रोजी प्रकाशित
म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनविणारा अभियंता गजाआड
म्हाडाच्या लॉटरीचे बनावट संकेतस्थळ बनविणाऱ्या २७ वर्षीय बी.टेक. अभियंत्यास सायबर सेल पोलीस ठाण्याने अटक केली. म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनवून त्यावर गुगलकडून जाहिराती मिळवून तो आठवडय़ाला दीड लाख रुपये कमवत होता.
First published on: 24-04-2015 at 04:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada fake website pionir behind the bar