आपल्या उत्पन्नानुसार मुंबईत घर घेण्याची सर्वसामान्यांसाठी एकच संधी असते आणि ती म्हणजे म्हाडाची सोडत. त्यामुळेच अनेकजण म्हाडाच्या घरांसाठी अर्जफाटे करत असतात आणि सोडतीच्या दिवसाकडे लक्ष ठेवून असतात. बुधवारचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. रंगशारदामध्ये सोडतीच्या निकालासाठी जमलेल्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद-निराशेचे भाव होते. घराची लॉटरी लागलेले अर्थात आनंदी तर संधी हुकलेले निराश.. पण पुन्हा पुढच्या वर्षी नव्याने अर्ज भरण्याचा निर्धार.. हा आशा निराशेचा खेळ टिपत घराची लॉटरी लागलेल्यांशी साधलेला हा संवाद..
आता दिराचे लग्न नक्की होणार
मालाडमध्ये राहणाऱ्या अपर्णा सावंत यांना पहिल्याच फटक्यात म्हाडाची सोडत लागली. त्यांच्या यजमानांनी याआधी दोन वर्षे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. यंदा लग्न झाल्यावर अपर्णा यांनी पुन्हा अर्ज केला़  त्यानुसार अपर्णा यांनी अर्ज दाखल केला आणि योगायोगाने लॉटरीही लागली. केवळ स्वतंत्र घर नाही म्हणून अपर्णा यांच्या दिराचे लग्न होत नव्हते. आता घर मिळाल्याने दिराच्या लग्नातीह अडथळा दूर होईल, अशी भावना अपर्णा यांनी व्यक्त केली.
नातेवाईकांच्या नावे अर्ज
अजित पाटील गेल्या तीन वर्षांपासून स्वतच्या आणि नातेवाईकांच्या नावाने लॉटरी काढत होते. दरवर्षी तब्बल ८ फॉर्म काढणे हा नियम ठरलेला. पण त्याचवेळी कोणाच्याही नावाने घर लागले तरी, ते आपणच खरेदी करणार याबाबतच त्यांच्यात व नातेवाईकांत ठराव झाला होता. मात्र, मागच्या वेळी मामाच्या नावाने लॉटरी लागली पण सदनिका मामानेच खरेदी केली. परंतु आमच्यात वितुष्ट आले नाही. यंदाही प्रथेप्रमाणे अर्ज भरले व माझ्याच नावाने लॉटरी लागली, असे अजित सांगतात़
भावी पत्नीचा पायगुण
चेतन देवेंद्र सुर्वे यांनी दुसऱ्यांदा म्हाडामध्ये आपले नाव नोंदवले होते. यावेळी आपला अर्ज त्यांनी भावी पत्नीच्या हाताने भरून घेतला होता. योगायोगाने सोडत जाहीर झाली आणि यादीत त्यांचे नावे जाहीर झाले. त्यामुळे आपली भावी पत्नी घरानिमित्त भाग्यशाली ठरली, असे मत चेतन यांनी व्यक्त केले. लग्नानिमित्त घराच्या शोधात होतो, पण मनासारखे घर सापडत नव्हते. विरारमध्ये एका बिल्डरशी बोलणी सुरू होती. पण त्या यशस्वी झाल्या नाही. म्हाडाच्या निमित्ताने आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे चेतन यांनी सांगितले.