मुंबई : मुंबईतील मालकीच्या जागांचा शोध घेणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळाला वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्गालगत आठ एकर क्षेत्रफळाचा भूखंड गवसला आहे. इतकी वर्षे या भूखंडाबाबत अनभिज्ञ असलेल्या म्हाडाला एकप्रकारे ही जागेची ‘लॉटरी’च लागली असून तेथे व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे.
वांद्रे पश्चिम येथील एस. व्ही. रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडणाऱ्या चौकापासून ते वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड कार्यालयापर्यंतची आठ एकर जागा मुंबई मंडळाची असून मोक्याच्या आणि इतक्या मोठय़ा जागेबाबत मुंबई मंडळ अनभिज्ञ होते. मंडळाने ही जागा ताब्यात घेतली असून ही जागा व्यावसायिक वापरासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या जागेवर व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मुंबई मंडळाचा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असून यासाठी मोठय़ा प्रमाणावर निधीची गरज आहे. या प्रकल्पासाठी येणारा खर्च भरुन काढण्यासाठी, तसेच भविष्यात प्रकल्प मार्गी लावण्यासाठी येथे व्यावसायिक संकुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. आठ एकर जागेवर व्यावसायिक संकुल बांधण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार असून त्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचेही म्हसे यांनी सांगितले.
आठ एकर जागेवर व्यवसायिक संकुल बांधणे व्यवहार्य आहे का याचा अभ्यास करण्याची जबाबदारी सल्लागारावर सोपविण्यात येण्यात येणार आहे. या भूखंडावर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण असून अतिक्रमण हटविणे आणि रहिवाशांचे पुनर्वसन करणे ही दोन मोठी आव्हाने मंडळासमोर आहेत. त्यामुळे या जागेवर एकूण किती अतिक्रमणे आहेत, किती जागा मोकळी आहे, रहिवाशांचे पुनर्वसन कसे करता येईल या सर्व बाबींचा अभ्यासही या सल्लागाराला करावा लागणार आहे. सल्लागाराचा यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर आणि प्रकल्प व्यवहार्य ठरल्यानंतर प्रत्यक्ष कामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.