पुण्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सुमारे १०० एकर अतिरिक्त जमिनीवर आता म्हाडाकडून हजारो घरे बांधली जाणार आहेत. साखर कारखान्याची कर्जे व देणी भागविण्यासाठी गृहबांधणीचा प्रकल्प राबविण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून लवकरच त्यावर निर्णय होईल, असे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी सांगितले.
पुणे परिसरात जागांचे भाव गगनाला भिडत आहेत. या पाश्र्वभूमीवर म्हाडाकडून हजारो घरे बांधली गेल्यास मध्यमवर्गीयांना मोठाच दिलासा मिळणार आहे. या साखर कारखान्याकडे सुमारे २५० एकर जमीन असून त्यापैकी १०० एकर अतिरिक्त आहे. या जागेवर घरबांधणी झाल्यास कारखान्याला सुमारे १०० ते ११० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. त्यातून थेऊर कारखान्याची देणी भागविता येतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.
राज्यभर फॉम्र्युला वापरणार?
राज्यात १५ ते २० कारखाने डबघाईला आले असून तेवढेच कारखाने आर्थिक कठीण परिस्थितीतही आहेत. सहकारी क्षेत्रातील ८० कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. राज्यातील सर्वच शहरांमध्ये आणि त्यालगतच्या परिसरांत जागांचे भाव वाढत आहेत. आर्थिक परिस्थितीतून सावरण्यासाठी साखर कारखान्यांच्या अतिरिक्त जमिनीवर घरबांधणीचा ‘फॉम्र्युला’ अनेक कारखान्यांच्या बाबतीतही वापरला जाऊ शकतो. थेऊर कारखान्याचा प्रयोग हा त्या दृष्टीने अभिनव व दिशादर्शक ठरण्याची शक्यता आहे.