मुंबई : शास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेले, ग्वाल्हेर घराण्याचे गायक आणि पुढे पॉप संगीतात नावारुपाला आलेल्या मिलिंद इंगळे यांच्या गझल गायनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘मुखातिब’ हा त्यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी वरळीतील नेहरू सेंटर येथे होणार आहे. या कार्यक्रमात गुलाम अली, मेहंदी हसन, जगजीत सिंग, पंकज उधास यांच्यासारख्या प्रसिध्द गझल गायकांची लोकप्रिय गाणी मिलिंद इंगळे सादर करणार आहेत.
नेहरू सेंटरच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता नेहरू सेंटरच्या सभागृहात ‘मुखातिब’ हा गझल गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे. ‘आमच्या घरात शास्त्रीय संगीताची परंपरा चालत आलेली आहे. ग्वाल्हेर घराण्याची गायकी असलेली आमची पाचवी पिढी आहे. मात्र, शास्त्रीय संगीतात माझे मन रमण्याऐवजी भावसंगीतात ते अधिक रमले, वडिलांच्या सल्ल्यावरून मी के. महावीर आणि राजकुमार रिझवी यांच्याकडून गझल गायनाचे रितसर प्रशिक्षण घेतले. मात्र, १९८८ साली माझे ‘यह है प्रेम’ हे हिंदी गाणे गाजले. त्यानंतर ‘गारवा’ हा गाण्यांचा अल्बम गाजला आणि पॉप गायक म्हणून मला लोकप्रियता मिळाली. त्यामुळे मग मधून मधून ‘मुखातिब’ या कार्यक्रमातून मी गझलगायन करत राहिलो. यावेळी नेहरू सेंटरच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे’, अशी माहिती मिलिंद इंगळे यांनी दिली.
‘मुखातिब’ या कार्यक्रमात विशाल धुमाळ, चिंटू सिंग वासीर आणि समीर शीवगार हे वादक त्यांना संगीतसाथ करणार आहेत. तर मिलिंद इंगळे ज्या गझल गाणार आहेत, त्यांची माहिती ओघवत्या निवेदनातून रसिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुहैल अख्तर सांभाळणार आहेत. पॉप आणि भावसंगीतासाठी प्रसिध्द असलेल्या मिलिंद इंगळे यांची गझल गायकी अनेकांनी अजून अनुभवलेली नाही.
‘गझल गायनाचे शिक्षण घेतल्यानंतर १९९३ साली देशपातळीवर गझल गायनाची स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यावेळी देशभरातून ९०० स्पर्धकांनी त्यात सहभाग घेतला होता. या ९०० जणांमधून ५ शहरांतील १५ गायक निवडले गेले आणि त्यांच्यात झालेल्या अंतिम फेरीत १ लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मला मिळाला होता. गझल गायनाची आवड आणि त्यासाठी अनेक गुरूंकडून मार्गदर्शन घेऊन स्वत:ला गझल गायक म्हणून घडवले आहे’, अशी आठवण सांगत ‘मुखातिब’ या कार्यक्रमातून काही सरस गझल प्रेक्षकांसमोर सादर करणार असल्याचेही इंगळे यांनी सांगितले. ‘मुखातिब’ हा गझल गायनाचा कार्यक्रम विनामूल्य असून त्याच्या प्रवेशिका नेहरू सेंटर येथे उपलब्ध आहेत.