मुंबई : राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिकांच्या रकमांमध्ये दुपटीने वाढ केल्यानंतर राज्यभरातील १८०० भजनी मंडळांना साहित्य खरेदी करण्यासाठी २५ हजार रुपयांचे भांडवली अनुदान देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी शुक्रवारी केली. यंदा प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

अनुदानासाठी मंडळांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यासाठी उद्या, शनिवारपासून ६ सप्टेंबर या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर अर्ज दाखल करता येईल. आषाढी वारीनिमित्त मानाच्या १० पालख्यांबरोबरच सुमारे ११०० दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपयांचे अनुदान सरकारच्या वतीने देण्यात आले. यापाठोपाठ भजनी मंडळांना साहित्य देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

भाजपकडून हिंदुत्वाची कास अधिक घट्ट करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न करण्यात येत आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर बोजा आला आहे. विविध सरकारी योजनांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. बिले थकल्याने ठेकेदारांची ओरड सुरू आहे. काटकसर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, धार्मिक कार्यक्रमांसाठी पैसे वाटले जात आहेत.

निधी आणणार कुठून? भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान वाटण्यात येणार आहे. यामुळे सांस्कृतिक विभागावर साडेचार कोटींचा बोजा पडणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सांस्कृतिक कार्य विभागासाठी ११८६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेलार यांनी राजकीय फायद्याचे गणित डोळ्यासमोर ठेवून विविध समाजघटकांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सांस्कृतिक विभागासाठी करण्यात आलेली वित्तीय तरतूद आणि वाढता खर्च लक्षात घेता वित्तीय गणित साधणे वर्षाअखेरीस कठीण जाणार आहे. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून या खात्यासाठी अधिकची तरतूद केली जाऊ शकते, पण त्यातून वित्तीय नियोजन कोलमडते.