मुंबई : मुंबईतील टँकरमाफीयांच्या माध्यमातून पाणीपुरवठय़ात सुमारे १० हजार कोटींचा गैरव्यवहार होत असल्याच्या आरोपांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपचे आशीष शेलार यांनी मुंबईतील पाणी प्रश्नावर मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान सामंत बोलत होते. पाणी चोरी रोखण्यासाठी आणि पाणी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी  पालिकेमार्फत ११० किलोमीटर लांबीच्या  जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. ९६ हजार ४०० ठिकाणी गळती शोधून दुरुस्ती करण्यात आली असून सुमारे १० हजार अनधिकृत जलजोडण्या खंडित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात  समान पाणी वाटपाबाबतचा  समितीचा अहवाल महानगरपालिकेकडून तत्काळ मागवण्यात येईल. वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग मुंबईकरांसाठी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. 

 दोन प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर २४ तास पाण्याचे प्रकल्प अयशस्वी ठरले. यासाठी १५० कोटी रुपये सल्लागाराला देण्यात आले. तर, २५० कोटी कंत्राटदाराला म्हणजे जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करूनही हा प्रकल्प महापालिका यशस्वी करू शकली नाही, असा आरमेप शेलार यांनी केला. शहरात सुमारे मोठय़ा प्रमाणात विहिरी आणि कुपनलिका असून  केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या पाहणीत शहरातील एका कुपनलिकेमधून ८० कोटीची  पाणी चोरी टँकरमधून होत असल्याचे आढळून आले आहे. याचा अर्थ मुंबईत सुमारे १० हजार कोटींचा पाण्याचा घोटाळा टँकरमार्फत केला जातो, असा आरोप करीत चौकशीची मागणी शेलार यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister uday samant announces inquiry into rs 10000 crore tanker water scam in mumbai zws