मुंबई : डॉक्टरांचा निष्काळजीपणा, डॉक्टरांकडून वैद्यकीय आचारसंहितेचा भंग यासंदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नागरिकांकडून आलेल्या तक्रारी अनेक वर्षांपासून प्रलंबित हाेत्या. मात्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विशेष समितीची नेमणूक केल्याने मागील काही वर्षांमध्ये डाॅक्टरांसंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यात परिषदेला यश आले आहे. त्यामुळे प्रलंबित असलेल्या १,७०० तक्रारींची संख्या ६०० पर्यंत कमी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात नोंदणीकृत १ लाख ९० हजार डॉक्टर आहेत. या नोंदणीकृत डॉक्टरांकडून वैद्यकीय आचारसंहितेचे काहीवेळा उल्लंघन होते. रुग्णांवर उपचार करताना झालेला निष्काळजीपणा, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू होणे, रुग्णांकडून भरमसाट शुल्क वसूल करणे अशा विविध तक्रारी रुग्ण, त्यांचे नातेवाईक व काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. मागील काही वर्षांपासून या तक्रारींचा निपटारा करण्याचे काम संथपणे होत असल्याने प्रलंबित तक्रारींचे प्रमाण वाढले हाेते. त्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे जवळपास १,७०० तक्रारी प्रलंबित राहिल्या होत्या. त्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष विंकी रूघवानी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तक्रारींचा निपटारा करण्यावर भर दिला. त्यासाठी त्यांनी एका तक्रार निवारण समितीची स्थापना केली. या समितीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे आलेल्या तक्रारींचा नियमितपणे मागोवा घेतला. तक्रारींची दखल घेत समितीने मागील काही वर्षांत निम्म्याहून अधिक तक्रारींचा निपटारा केला आहे.

हेही वाचा – अबुधाबीहून मुंबईत येणाऱ्या विमानात प्रवाशाकडून धुम्रपान, सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

२०१९ पूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे जवळपास १,७०० तक्रारी होत्या. मात्र समितीने नियमितपणे केलेल्या कामामुळे या तक्रारींची संख्या आता ६०० पर्यंत आली आहे. प्रलंबित तक्रारींबरोबरच नव्याने नोंदविण्यात येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे डॉक्टरांविरोधात तक्रार करणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना धीर मिळाला आहे. तसेच हेतूपुरस्पर डॉक्टरांविरोधात करण्यात आलेल्या काही प्रकरणात निर्दोष असलेल्या डॉक्टरांनाही यामुळे दिलासा मिळण्यास मदत झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. विंकी रूघवानी यांनी दिली.

हेही वाचा – म्हाडा उपाध्यक्षांच्या दालनात पुन्हा धक्काबुक्की, खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ऑनलाईनमुळे तक्रारींचे प्रमाण वाढले

डाॅक्टरांचा निष्काळजीपणा, वैद्यकीय आचारसंहितेचे उल्लंघन याबाबत तक्रार करायची झाल्यास तक्रारदाराला मुंबईतील कार्यालयात प्रत्यक्ष येऊन तक्रार करावी लागत असे. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण वर्षाला साधारणपणे २० ते ३० इतके असे. मात्र २०१९ पासून ऑनलाईन तक्रारीची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर डॉक्टरांविरोधातील तक्रारींचे प्रमाण वाढले असून आता वर्षाला साधारणपणे ५० ते ६० तक्रारी येऊ लागल्या आहेत. तसेच ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता निर्माण होण्यास मदत झाली असल्याचे डॉ. विंकी रूघवानी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmc success in redressal of complaints against doctors number of complaints from 1700 to 600 mumbai print news ssb