मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उत्तन, भाईंदर ते विरार दरम्यान ५५ किमी लांबीचा सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पासाठीच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार असून येत्या १५ दिवसांत हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल.

मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि अतिवेगवान प्रवासासाठी सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्ग बांधण्यात येत आहेत. पालिकेकडून प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल- वांद्रे वरळी-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत सागरी सेतू बांधला जात आहे. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू बांधला जात आहे. या सागरी सेतूचा वर्सोवा-विरार आणि पुढे पालघर असा विस्तार ‘एमएमआरडीए’ जाहीर करणार होती. यासाठी प्राधिकरण आराखडा तयार करणार होते. मात्र महापालिकेने वर्सोवा-दहिसर, भाईंदर असा २२ किमी लांबीचा सागरी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय घेऊन यासाठीची कार्यवाही सुरू केली. पालिकेच्या या सागरी किनारा मार्गामुळे वर्सोवा-विरार सागरी सेतूची आवश्यकता उरलेली नाही. यामुळे एकाच परिसरात दोन प्रकल्प होणार असल्याने राज्य सरकारने वर्सोवा-विरार सागरी सेतू प्रकल्पात बदल करण्याची सूचना केली होती.

हेही वाचा…मॅक्सी कॅबसारखी वाहने अधिकृत झाल्यास रस्ते सुरक्षेसाठी धोक्याचे, एसटी महामंडळाची सेवा कोलमडण्याची भिती

त्यानुसार एमएमआरडीएने वर्सोवा-विरार सागरी मार्गाऐवजी उत्तन, भाईंदर-विरार असा सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेऊन यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. मार्च २०२४ मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. मान्यता मिळाल्यानंतर एमएमआरडीएने उत्तन-विरार दरम्यान ५५ किमी लांबीच्या आणि २४ किमी लांबीच्या सागरी सेतूचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले होते. हे काम आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आराखडा येत्या दहा दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर हा आराखडा मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा…आरोग्य विभागाची नववर्षात कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम! साडेआठ कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे होणार सर्वेक्षण…

उत्तन-विरार दरम्यान ५५ किमी आणि २४ किमी लांबीचा सागरी सेतू बांधण्यात येईल. भविष्यात या सागरी सेतूच्या टप्पा-२ अंतर्गत पालघरपर्यंत विस्तार होईल. एका आपत्कालीन मार्गिकेसह एकूण पाच मार्गिकेचा हा सेतू असेल.

सेतूच्या एका बाजूची रुंदी अंदाजे १९.५ मीटर असेल. तर सागरी सेतू प्रकल्पातील जोडरस्ता आपत्कालीन मार्गिकेसह चार मार्गिकांचा असेल.

जोडरस्त्याची एका बाजूची रुंदी १५.५ मीटर असणार आहे. या सागरी सेतूवर विरार, उत्तन आणि वसई असे तीन आंतरबदल मार्ग (कनेक्टर) असतील. त्यामुळे वाहनचालक – प्रवाशांना या तीन ठिकाणांहून सागरी सेतूवर ये-जा करता येणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यास नरिमन पाॅइंट ते विरार प्रवास अतिवेगवान होणार आहे. तर मिरा – भाईंदर, वसई – विरारमधील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. तसेच मुंबई – अहमदाबाद मार्गावर पोहोचणेही सोपे होईल.