विद्यापीठाने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी माहिती केंद्र सुरू न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेच शनिवारी विद्यापीठात चौकशी केंद्र सुरू केले. यामुळे त्या ठिकाणी चौकशीसाठी आलेल्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. यातच १३ मे पासून त्यांची परीक्षा आहे. त्यामुळे विद्यापीठात चौकशीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठीचे केंद्र दुसरा शनिवार असला तरी सुरू ठेवावे अशी मागणी मनविसेने शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनाला भेटून केली होती. तरीही विद्यापीठाने ते सुरू ठेवले नाही. अखेर मनविसे पदाधिकारी आणि सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनीच तेथे खुच्र्या मांडून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.