मुंबई : ऑनलाईन बँकिंग, गुगल पे, फोन पे आल्यापासून सुट्टे पैसे जवळ ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुंबईत अगदी भाजीवाल्यांपासून ते छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये ग्राहक ऑनलाईन व्यवहार करू लागले आहेत. रोख रकमेऐवजी ऑनलाइन पैसे देण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र, मुंबईतील बहुसंख्य रिक्षा – टॅक्सीचालक ऑनलाइन व्यवहारापासून दूरच आहेत. सुट्टे पैसे किंवा रोख रक्कमेच्या अभावामुळे प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होत आहेत. भाडे आकारणी पद्धत सुकर होण्यासाठी टॅक्सी-रिक्षाचालकांनी ऑनलाइन बँकिंगचा वापर करणे आवश्यक असून प्रवाशांकडून तशी मागणी होऊ लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत २५ ते ३५ हजार टॅक्सी आणि  ४० ते ५० हजार टॅक्सीचालक, तर सुमारे दोन लाख रिक्षा आणि सुमारे ३.२५ लाख रिक्षाचालक आहेत. यापैकी बहुतांश चालकांच्या उपजीविकेचे साधन टॅक्सी आणि रिक्षाच आहे. मात्र, ४० ते ५० टक्के टॅक्सीचालकांकडे मोबाइलद्वारे ऑनलाइन बँकिंग सुविधाच नसल्याची बाब उघडकीस आली आहे. अनेक टॅक्सीचालक ‘स्मार्ट’ मोबाइल वापरत नसल्याने ‘स्मार्ट’ तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाही. तसेच, काही प्रमाणात रिक्षाचालकांची अशीच अवस्था आहे.

हेही वाचा >>> मुंबई : मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन देताच गिरणी कामगारांचा मोर्चा स्थगित

टॅक्सी – रिक्षाचालकांनी भाडे नाकारणे बंद करायला हवे. आजघडीला विविध सेवा पुरवणारे व्यावसायिक ऑनलाइन पैसे स्वीकारतात. भाजीवालेही ऑनलाइनद्वारे डिजिटल व्यवहार करतात. मात्र, टॅक्सी आणि काही प्रमाणात रिक्षाचालक ऑनलाइन व्यवहार करत नाहीत. त्यामुळे सुट्टे पैसे किंवा रोख रक्कम नसल्यास प्रवासी आणि चालकांमध्ये खटके उडतात. मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी ऑनलाइन पध्दतीने भाडे स्वीकारायला हवे.

– मयूर पवार, प्रवासी

टॅक्सी व रिक्षाचालकांनी यूपीआयद्वारे पैसे स्वीकारण्यास सुरूवात केली तर सुट्टे पैशांची चिंता मिटेल. अनेक वेळा ॲप आधारित सेवेचे, मीटर रिक्षापेक्षा अधिक भाडे होते. जर मीटर रिक्षा व टॅक्सीचालकांनी ऑनलाईन पैसे आकारण्यास सुरुवात केल्यास मोठ्या संख्येने प्रवासी पुन्हा रिक्षा, टॅक्सीकडे वळतील.

– गंधर्व पुरोहित, प्रवासी

हेही वाचा >>> मुंबई : झोपु सदनिका विक्रीवरील १० वर्षांची अट शिथिल ? पूर्वलक्ष्यी प्रभावाबाबत मात्र संभ्रम

टॅक्सीचालक अद्याप ‘डिजिटल’ युगाशी जोडले गेलेले नाहीत. अद्याप ऑनलाइन भाडे स्वीकारण्याची सुविधा सर्व टॅक्सीचालकांकडे नाही. तसेच, युनियननेही याबाबत प्रसार, प्रचार केला नाही. प्रवासी टॅक्सीमध्ये बसण्यापूर्वी सुट्ट्या पैशांची सोय करतात. त्यामुळे सुट्टे पैसे अथवा रोख रक्कम नसल्यामुळे चालक – प्रवाशांमध्ये वाद होतात असे म्हणणे योग्य नाही.

– ए. एल. क्वॉड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन

इ- वॉलेट वापरावर २०१५ पासून भर देण्यात आला आहे. त्यावेळी १८ हजारांहून अधिक रिक्षाचालकांकडे इ-वॉलेट यंत्रणा प्रदान करण्यात आली होती. मात्र, सध्यस्थितीत सुमारे ४० ते ५० टक्के टॅक्सी, रिक्षाचालकांकडे स्मार्ट मोबाइल नसल्याने त्यांच्याकडे ऑनलाइन बँकिंग सुविधा नाही. स्मार्ट मोबाइल वापरणे आणि त्याद्वारे डिजिटल भाडे स्वीकारण्याची माहिती नसल्याने आजही रोख रक्कमेनेच व्यवहार करण्यात येतात. आजघडीला ‘डिजिटल’ व्यवहार करणे आवश्यक आहे.

– शशांक राव, अध्यक्ष,

मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन

टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी ऑनलाइन भाडे आकारणे हे अनिवार्य नाही. सध्या अनेक रिक्षा, टॅक्सीचालकांकडे ही सुविधा आढळते. सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होतात. मात्र, ऑनलाइन भाडे आकारणे सध्या तरी अनिवार्य करण्यात आलेले नाही. मात्र, कालांतराने यावर विचार केला जाईल.

– विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money rickshaw taxi drivers should transact online increasing demand of mumbaikars mumbai print news ysh