मुंबई :चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका महिन्यात ३.६२ लाख कोटी रुपयांपैकी दोन तृतीयांशपेक्षा अधिक (२.४१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक) नोटा बँकांमध्ये जमा झाल्या, असे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
रिझव्र्ह बँकेने १९ मे रोजी अचानक दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून परत घेण्याचा निर्णय घेतला. ३० सप्टेंबपर्यंत बँकांमध्ये या नोटा जमा करण्याच्या किंवा त्याच मूल्याच्या दुसऱ्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले आहे. मार्च २०२३ पर्यंत चलनात एकूण ३.६२ लाख कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा होत्या.
दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन तृतीयांशपेक्षा अधिक म्हणजे जवळपास ८५ टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या प्रभावाबाबत दास यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, ‘मी आता निश्चितपणे सांगू शकतो की, या नोटा परत घेण्याच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होणार नाही.’
अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही
‘एसबीआय रिसर्च’च्या अहवालाबाबत दास यांनी सांगितले की, दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याचा अर्थिक वृद्धी दराशी कोणाही संबंध नव्हता. या निर्णयाचा परिणाम नंतर स्पष्ट होईल, परंतु अर्थव्यवस्थेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे दास म्हणाले.