मुंबई : रेल्वे रुळावर लाकडी पेट्या ठेवून घातपात घडविण्याचा गुरुवारी रात्री प्रयत्न करण्यात आल्याची घटना मिरा रोड येथे उघडकीस आली. हा प्रकार मोटरमनच्या लक्षात आल्यानंतर त्याने प्रसंगावधान दाखवून लोकल थांबवली आणि मोठा अनर्थ टळला. खोडसाळपणे रुळावर या लाकडी पेट्या ठेवण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पश्चिम रेल्वेची एक लोकल गुरूवारी रात्री विरारहून चर्चगेटच्या दिशेने निघाली होती. मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पेट्या ठेवल्याचे रात्री ९,३० च्या सुमारास सदर लोकलच्या मोटरमनच्या दृष्टीस पडल्या. मोटरमनने प्रसंगावधान दाखवून तात्काळ लोकल थांबवली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रुळाच्या मध्यभागी लाकडी पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. त्याची पाहणी केली असता त्या रिकाम्या असल्याचे आढळून आले. रेल्वे मार्गात हेतुपुरस्सर अडथळा निर्माण करण्यासाठी या पेट्या ठेवण्यात आल्या होत्या, असे वसई रेल्वे पोलिसांनी सांगितले.

ही घटना गंभीर आहे. त्या लाकडी पेट्यांमध्ये जर दगड अथवा तत्सम अवजड साहित्य असते तर अपघात घडू शकला असता, असे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणपत तुंबडा यांनी सांगितले. मात्र मोटरमनने सतर्कता दाखवून लोकल थांबवली आणि पुढील अनर्थ टळला असे तुंबडा यांनी सांगितले. या लाकडी पेट्या हेतुपुरस्सत तसेच खोडसाळपणे रुळांवर ठेवल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचेही त्यांनी सांगतिले. याप्रकरणी मिरा रोड रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तर कविता भावसार यांनी तक्रार केली. त्यानुसार वसई रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात १२५ (अ), १२६ (२) ३२९, ३२९ (३) तसेच भारतीय रेल्वे कायद्याच्या १५२ अन्वये रेल्वे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण करणारे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

रेल्वेची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हशतवादी हल्ल्यानंतर रेल्वे यंत्रणा सतर्क झाली आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही रेल्वे स्थानकात आपली गस्त वाढविली आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलीस तैनात करून बॅगांची तपासणी करण्यात येत आहे तसेच स्थानकातील हालचालीवर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रवासी ये – जा करण्याचे मार्ग, फलाट आदी ठिकाणी गस्त घालण्यात येत आहे, असे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितले.

वसई आणि विरार रेल्वे स्थानकात लांबपल्ल्याच्या गाड्या थांबतात. तेथेही तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकात खाद्यपदार्थ विक्रेते ( कॅन्टीन चालक), रेल्वे सफाई कर्मचारी, बूट पॉलिश करणारे, हमाल यांच्याशी संपर्क साधून स्थानकात घडणाऱ्या बाबींची माहिती घेण्यात येत आहे. स्थानकात एखादी संशयास्पद वस्तू, व्यक्ती किंवा अन्य बाबी निदर्शनास आल्यास तातडीने कळवावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.