वाढत्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तोटय़ात असतानाही बेस्टनेही बसमध्ये नवीन बदल केला आहे, त्या पाठोपाठ आरामदायी प्रवास व्हावा या उद्देशाने एसटी महामंडळानेही एसटीच्या ताफ्यात बदल केलेल्या बसगाडय़ा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला ‘परिवर्तन’ असे नाव देण्यात आले आहे. एसटीच्या ताफ्यातील नवीन परिवर्तन श्रेणीतील स्टील बांधणीच्या मजबूत बसेस नवीन रंगात लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत बांधलेली बस येत्या काही दिवसांत प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वी एसटीच्या बसेस अ‍ॅल्युमिनियममध्ये बांधल्या जात, त्यामुळे एखादा अपघात घडल्यावर बसचे अधिक नुकसान होत होते. त्यामुळे प्रवाशांनाही अनेक गंभीर दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना कमी व्हाव्यात व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अ‍ॅल्युमिनियमऐवजी मजबूत दणकट अशा माइल्ड स्टीलमध्ये बांधणी केलेल्या बसेस आणण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर पुणे येथील दापोडी येथे प्रायोगिक तत्त्वावर एक बस तयार करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांनी सुचवलेले बदल त्यात करण्यात आले आहेत.

बसची वैशिष्टय़े

* जुन्या बसच्या तुलनेत नवीन बसच्या उंचीत ३० सेंटिमीटरने वाढ. सामान ठेवण्याच्या जागेत तिप्पट वाढ.

*  खिडक्यांच्या आकारातही बदल.

*  बसच्या सांध्यांमध्ये थर्माकोलचा वापर. त्यामुळे आवाजापासून प्रवाशांची सुटका.

*  गाडीचे मार्ग फलक एलईडीमध्ये असून प्रवाशांना सूचना देण्यासाठी उद्घोषणा.

*  हवा खेळती राहण्यासाठी गाडीच्या छतावर तीन ‘रूफ हॅच’.

*  बसचे चाक नादुरुस्त झाल्यास ते बदलण्यासाठी पर्यायी चाक सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी बसवण्यात आले आहेत.

*  आणीबाणीच्या प्रसंगी प्रवाशांना सतर्क करण्यासाठी अलार्मची सोय, बस हवेतील रोध कमी करण्यासाठी बसची ‘एरोडायनॅमिक’ रचना.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc to get new buses under parivartan project