मुंबई…मुलुंड, भांडूप आणि विक्रोळीतील मिठागरांची जागा धारावीतील अपात्र रहिवाशांच्या घरांसाठी हस्तांतरीत करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका नुकतीच उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय याचिकाकर्त्यांनी घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल अशी आशा मुलुंडकरांना आहे. न्यायालयीन लढ्यासह रस्त्यावरची लढाई चालूच ठेवण्याचा निर्धार मुलुंडकरांनी केला आहे.

मुलुंडच्या मिठागराच्या जागेवर धारावीकरांसाठी घरे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही इथे एकही घर बांधू देणार नाही अशी ठाम भूमिकाही मुलुंडमधील रहिवाशांनी घेतली आहे. मिठागराच्या जागेवरील घरांच्या विरोधात आमचे जनआंदोलन सुरुच असून येत्या काळात ते आणखी तीव्र करु असा इशाराही यानिमित्ताने मुलुंडकरांनी दिला आहे. त्यानुसार लवकरच मानवी साखळी आंदोलन केले जाणार आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांचेही पुनर्वसन करण्यात येणार आहे. मात्र त्यांना धारावीबाहेर विविध ठिकाणी भाडेतत्वावरील गृहयोजनेत समावून घेतले जाणार आहे. यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत (डीआरपी) मुंबईतील विविध ठिकाणीच्या जागेची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार मुलुंडमधील ५८.५ एकरसह भांडुप आणि विक्रोळीतील मिठागराची जागा डीआरपीला देण्यात आली आहे. मात्र मुलुंडमधील मिठागरांच्या जागेवर घरे बांधण्यास मुलुंडकरांचा तीव्र विरोध आहे. त्यानुसार मुलुंडकरांनी त्याविरोधात जनआंदोलन उभे केले आहे.

अनेकदा मुलुंडकर रस्त्यावर उतरले आहेत. तर मुलुंडमधील अॅड सागर देवरे यांनी मिठागरांची जागा घरे बांधण्यास देण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मिठागरांच्या जागेचा वापर केल्याने पर्यावरण धोक्यात येईल असे म्हणत याचिका दाखल केली होती. मात्र नुकतीच न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे मिठागरांच्या जागेवर धारावीकरांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण मुलुंडकर मात्र मुलुंडमध्ये धारावीकरांसाठी घरे बांधून देणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे अॅड देवरे यांनी सांगितले. तर सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. मात्र त्याचवेळी रस्त्यावरची लढाई सुरुच राहणार आहे. केवळ मुलुंडवासीच नाही तर धारावी, कुर्ला, विक्रोळीतील रहिवासीही आमच्यासोबत असून तेही येत्या काळात जनआंदोलन करतील अशी माहिती मुलुंडमधील रहिवाशी मोहन सावंत यांनी दिली. मानवी साखळी आंदोलन, निदर्शने, उपोषण आणि जनजागृती मोहिम अशा सर्व प्रकारे आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुलुंडमध्ये पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. त्यात प्रकल्पाबाधितांच्या नावाखाली हजारो लोकांना येथे आणले जाणार आहे. तेव्हा पायाभूत सुविधा कशा पुरेशा पडणार. मिठागरांच्या जागेमुळे मुलुंडच्या अनेक भागात पावसाळ्यात पाणी साचत नाही. जर या जागांवर घरे बांधली तर मुलुंड पाण्याखाली जाईल अशी भीती मुलुंडमधील रहिवासी अमोल गुप्ते यांनी व्यक्त केली. कोणत्याही परिस्थितीत मुलुंडमध्ये घरे बांधू दिली जाणार नाहीत, कामास सुरुवात केल्यास हजारोंच्या संख्येने मुलुंडकर रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी दिला.