‘मेक इन इंडिया’ अंतर्गत १०० मीटर लांबीचा पोलादी पूल साकारला
मुंबई : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करण्यात आला असून गुजरातमधील भरूच जवळील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसीसी) मार्गावर १०० मीटर लांबीचा पोलादी पूल यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत या पुलाची उभारणी करण्यात आली असून बुलेट ट्रेन मार्गावरील आठ पूल तयार झाले आहेत. तर, उर्वरित २० पुलाचे काम सुरू आहे.
बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गात २८ पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी १७ पूल गुजरामध्ये आहेत. सध्या गुजरातमधील सुरत, आणंद, वडोदरा, भरूच येथे सात पुलांची उभारणी करण्यात आली असून दादरा नगर हवेलीमधील सिल्वासा येथे एका पुलाची उभारणी करण्यात आली आहे. भरूच येथे उभारण्यात आलेल्या पुलाची उंची १४.६ मीटर आणि रुंदी १४.३ मीटर असून या पुलाचे वजन १,४०० मेट्रीक टन इतके आहे. हा पूल तमिळनाडू येथील तिरूचिरापल्ली कारखान्यात तयार करण्यात आला आहे.
हा पूल ८४ मीटर लांब ‘लॉन्चिंग नोज’च्या साहाय्याने उभारण्यात आला असून त्याचे वजन सुमारे ६०० मेट्रिक टन आहे. पुलाच्या निर्मितीत सुमारे ५५,३०० टॉर-शियर प्रकारातील उच्च दर्जाच्या (टीटीएचएस) बोल्ट्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच या पुलाचे आयुष्य १०० वर्षे असेल. पुलाची उभारणी करताना डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसीसी) रेल्वे मार्गावर ब्लाॅक घेण्यात आला होता. माल वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण होईल याची खात्री करून टप्प्याटप्प्याने ब्लाॅक घेण्यात आला, असे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून सांगण्यात आले.
बुलेट ट्रेन मार्गावर हे पूल उभारले
– राष्ट्रीय महामार्ग ५३, सुरत, गुजरात येथे ६७३ वजनाचा आणि ७० मीटर लांबीचा स्टील पूल
– भारतीय रेल्वेच्या वडोदरा-अहमदाबाद मुख्य मार्गिकेवर, नाडियाड, गुजरात येथे १,४८६ मेट्रीक टन वजनाचा १०० मीटर लांबीचा स्टील पूल
– दिल्ली-मुंबई राष्ट्रीय एक्स्प्रेस वे, वडोदरा, गुजरात येथे ४,३९७ मेट्रीक टन वजनाचा २३० मीटर लांबीचा पूल
– दादरा आणि नगर हवेलीमधील सिल्वासा येथे १,४६४ मेट्रीक टन वजनाचा १०० मीटर लांबीचा पूल
– पश्चिम रेल्वेवर, वडोदरा, गुजरात येथे ६४५ मेट्रीक टन वजनाचा ६० मीटर लांबीचा पूल
– डीएफसीसी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर, सुरत, गुजरात येथे १,४३२ मेट्रीक टन वजनाचा १६० मीटर लांबीचा पूल
– डीएफसीसी रेल्वे मार्गावर, वडोदरा, गुजरात येथे ६७४ मेट्रीक टन वजनाचा ७० मीटर लांबीचा पूल
– डीएफसीसी रेल्वे मार्गावर, भरूच, गुजरात येथे १,४०० मेट्रीक टन वजनाचा १०० मीटर लांबीचा पूल