प्रदूषण नियंत्रण कृती आराखडय़ास केंद्राची मंजुरी; रस्ते स्वच्छ करणारी यंत्रे, विद्युतदाहिन्यांचा वापर
तीन वेळा दुरुस्ती केल्यानंतर मुंबईच्या हवेतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठीचा कृती आराखडा अखेरीस केंद्र सरकारने मंजूर केला आहे. पुढील तीन वर्षांसाठी रस्ते स्वच्छ करणारी यंत्रे, स्मशानभूमीत विद्युत दाहिन्या, सिग्नलचे सुसूत्रीकरण अशा अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार या आराखडय़ात व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईतल्या हवेमध्ये धूलिकणांचे वाढलेले प्रमाण, त्याचबरोबर घातक पीएम घटकांचे उत्सर्जन कमी करण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे. दिल्लीतील वाढत्या हवा प्रदूषणाच्या पाश्र्वभूमीवर मुंबईकरांसाठी ही बाब काही प्रमाणात दिलासा देणारी आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने २०१८ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील १७ प्रदूषित शहरांसाठी कृती आराखडा सादर करायचे होते. तब्बल चार महिने उशिराने यावर्षी एप्रिलमध्ये हा आराखडा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर करण्यात आला. त्यापैकी मुंबई, नाशिक आणि सोलापूर या तीन शहरांच्या आराखडय़ावर केंद्रीय मंडळाने आक्षेप नोंदवून सुधारणा सुचविण्यात आल्या होत्या. मुंबईच्या आराखडय़ात तीन वेळा सुधारणा केल्यानंतर अखेरीस ९ ऑक्टोबरला केंद्रीय मंडळ आणि केंद्र सरकारने त्यास मंजुरी दिल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सह-संचालक डॉ. व्ही. एन. मोटघरे यांनी सांगितले.
मंजुरी मिळालेल्या आराखडय़ानुसार हवेतील धूलिकणांचे वाढते प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाईल असे मोटघरे म्हणाले. प्रत्येक प्रभागास रस्ते स्वच्छ करण्याचे यंत्र देण्याचे यामध्ये प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. स्मशानभूमीत मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी विद्युत दाहिन्यादेखील वाढवण्यात येतील. अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे अधिकृत पार्किंगसाठी शंभर जागांच्या प्रस्तावाबाबत महापालिकेशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सिग्नलच्या सुसूत्रीकरणावर भर दिला जाईल. या सर्वासाठी केंद्राकडून मंजूर केलेल्या १० कोटी रुपयांच्या निधीपैकी सहा कोटी रुपये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास मिळाले आहेत. आराखडय़ाशी निगडित प्रत्येक घटक संस्थाशी यापूर्वी विचारविनिमय केला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच बैठक घेण्यात येईल.
राष्ट्रीय हरित लवादाने वाहने आणि औद्योगिक प्रदूषण, रस्त्यांवरील धूळ आणि वृक्षारोपण या चार घटकांवर यामध्ये भर देण्याचे निर्देश २०१८ मध्ये दिले होते. मुंबईच्या आराखडय़ासाठी आयआयटी मुंबई आणि निरीच्या माध्यमातून अभ्यास केला असून, २०२२ पर्यंत प्रदूषण २५ टक्क्य़ांनी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हवा प्रदूषणाची कारणे
राज्यातील हवेच्या प्रदूषणाच्या २०१८-१९च्या अहवालात मुंबईतील घातक पीएम घटक आणि नायट्रोजन ऑक्सॉइडच्या उत्सर्जनात मागील वर्षांपेक्षा वाढ झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले होते. हवामानाची गुणवत्ता नोंदवणाऱ्या वांद्रे आणि शीव येथील केंद्रावर या नोंदी घेण्यात आल्या होत्या. मुंबईतील वाढती वाहतूक, वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे बांधकाम हे घटक हवेतील प्रदूषणास कारणीभूत असल्याचे यामध्ये नोंदवण्यात आले होते.
