मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील प्रस्तावित डोंगरी कारशेड रद्द करून ती इतरत्र हलवावी, तसेच या कारशेडसाठी बारा हजाराहून अधिक झाडे कापली जाणार असून ही वृक्षतोड त्वरीत थांबवावी अशी मागणी डोंगरी आणि आसपासच्या गावातील स्थानिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. स्थानिकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच अजित पवार यांची भेट घेऊन यासंबंधीचे निवेदन दिले आहे. त्यावर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करु असे आश्वासन स्थानिकांना दिले आहे.

मेट्रो ९ मार्गिकेतील मूळ प्रस्तावित कारशेड राई, मुर्धा, मोर्वा येथून हलवून डोंगरी येथे नेले आहे. डोंगरीतील कारशेडला राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून ही जागाही एमएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. कारशेडच्या कामासाठी डोंगरीतील डोंगरावरील १२हजारांहून अधिक झाडे कापली जाणार आहेत. त्यामुळे डोंगरी आणि आसपासच्या गावातील स्थानिकांचा कारशेडला प्रचंड विरोध आहे. डोंगर नष्ट झाल्यास पर्यावरणाचा र्हास होणार असल्याचे म्हणत स्थानिकांनी डोंगरी कारशेडला विरोध केला आहे. डोंगरी कारशेड रद्द व्हावी यासाठी स्थानिकांनी जनआंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान कारशेडसाठीच्या वृक्षतोड करण्याबाबत जनसुनावणीचा शासन निर्णय जारी झालेला नसताना कंत्राटदाराच्या माध्यमातून वृक्षतोडीस सुरू करण्यात आली आहे. क्रमांक नसलेली झाडे तोडली जात आहेत. झाडांच्या वयाबाबत दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे ही वृक्षतोड बेकायदा असल्याचे म्हणत स्थानिकांची वृक्षतोडी थांबविण्यासह कारशेड रद्द करण्याची मागणी केली आहे. मागील रविवारी डोंगरीत यासाठी मानवी साखळी आंदोलनही करण्यात आले. यात सहा हजार स्थानिक सहभागी झाले होते.

अजित पवार यांचे आश्वासन

आंदोलनानंतरही एमएमआरडीए, स्थानिक महानगरपालिका तसेच राज्य सरकार लक्ष देत नसल्याने अखेर स्थानिकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी संपूर्ण विषय समजावून घेत याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री-नगरविकास मंत्री यांच्याशी चर्चा करु, यावर नक्की मार्ग काढू असे आश्वसान दिल्याची माहिती अॅड कृष्णा गुप्ता यांनी दिली.