मुंबई : गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबई सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर १३ किलो २४९ ग्रॅमहून अधिक वजनाचे सोने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जप्त केल्या. त्यांची किंमत साडेदहा कोटी रुपये असून सीमाशुल्क विभागाने या कारवाईत सात जणांना अटक केली. सीमाशुल्क विभागाने २४ कारवायांमध्ये हे सोने व इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत. मेणामध्ये लवपलेली सोन्याची भुकटी, कच्चे सोने, सोन्याचे लगड यांचा त्यात समावेश आहे. आरोपींनी कपडे, तसेच बॅगांमध्ये मोठ्या शिताफीने सोने लपवले होते. सीमशुल्क विभागाने १० ते १४ जुलै या काळात ही कारवाई केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी दुबई आणि अबुधाबी येथून आलेल्या प्रत्येकी दोन, तर जेद्दाह येथून आलेल्या एक भारतीय प्रवाशाला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४८५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. यापैकी काही सोने शरिरावर चिकटवण्यात आले होते, तर काही सोने कपडे, तसेच बॅगेत गुप्त जागात तयार करून लपवण्यात आले होते.

हेही वाचा…अमली पदार्थ तस्करीप्रकरणी वाशीतून एकाला अटक, एनसीबीची कारवाई

याशिवाय मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश आणि हरिद्वार, उत्तराखंड येथील रहिवासी असलेल्या दोन भारतीय नागरिकांना औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी पकडले व सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून १९५० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सोन्याची भुकटी करून ती मेणात लपवण्यात आली होती. सुरक्षा रक्षकांपासून दडवण्यासाठी ते शौचालयात नळाखाली लपवण्यात आले होते. त्या कारवाईत ३०१० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत एक कोटी ८९ लाख रुपये आहे.

या सर्व कारवायांमध्ये अबुधाबी येथून आलेल्या १२ जणांना, दुबईहून आलेल्या दोघांना, तर बहरीन व शाहजाह येथून आलेल्या प्रत्येकी एका अशा एकूण १६ प्रवाशांनी बॅगांमध्ये सोने व इलेक्ट्रॉनिक वस्तू लपवल्या होत्या. त्याच्याकडून ३४३१ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत सव्वादोन कोटी रुपये आहे. त्यांना सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अडवले. या आरोपींना नोटीस देण्यात आली आहे.

हेही वाचा…२६३ कोटींचे प्राप्तिकर गैरव्यवहार प्रकरण : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पतीसह तिघांविरोधात आरोपपत्र, आरोपपत्रात तीन कंपन्यांचाही समावेश

अन्य एका कारवाईत बँकॉकला जाणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना सीमाशुल्क विभागाने विमानतळावर अडवले. त्याच्याकडून ४५ लाख रुपयांचे विदेशी चलनही जप्त करण्यात आले. त्यात ७ हजार ३०० युरो, अडीच हजार अमेरिकन डॉलर्स, २९ हजार पाऊंड आणि १२ हजार न्यूझीलंड डॉलर्स जप्त करण्यात आले. आरोपींनी लॅपटॉपच्या बॅगमध्ये चलन लपवले होते, असे सीमाशुल्क विभागाने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai customs seize over 13 kg of gold and electronics over rs 10 crore in five day operation arrest seven mumbai print news psg