मुंबई : आरेमध्ये मंगळवारी रस्ता ओलांडताना हरणाचा अपघात झाला. हरीण छोट्या टेम्पोखाली आला होता. दरम्यान, आसपासच्या नागरिकांनी तातडीने मदत करून हरणाची सुटका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरे येथील दुग्ध वसाहतीतील रस्त्यावर मंगळवारी सकाळी हरीण रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने तसेच भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे हरीण गोंधळले आणि त्यातच ते छोट्या टेम्पोखाली आले. घटना घडताच आसपासचे नागरिक मदतीला धावून आले आणि त्यांनी हरणाचे प्राण वाचविले. आरे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगतच असून आरे जगंल हे विविध पक्षी आणि प्राण्यांचा अधिवास आहे. या परिसरात अनेकदा बिबट्याही दृष्टीस पडतो. दरम्यान, आरेमध्ये वाढलेली वाहनांची वर्दळ, त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे आरे जंगल असूनही ते प्राण्यांसाठी सुरक्षित नाही. याआधीही भरधाव वाहनांमुळे प्राण्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

गेले अनेक दिवस या परिसरातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी एका २० वर्षीय तरुणाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. यामुळे काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर गतीरोधक उभारावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली होती. वेगाने जाणारी वाहने पादचारी, तसेच वन्यजीवांसाठी मोठा धोका निर्माण करतात. गतीरोधक नसल्यामुळे वाहनांचे वेगावर नियंत्रण नसते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. यापूर्वी एक भरधाव वेगात धावणारा टेम्पो झाडावर आदळला होता. याचबरोबर रात्री १० वाजल्यानंतर परिसरात भरधाव वेगात दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालक वाहने चालवित असतात . दरम्यान, आरे परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण होण्याआधी अपघातप्रवण भागात आणि चार रस्ते एकत्र येतात तेथे गतीरोधक आणि वेगाच्या निर्बंधाबद्दल सतर्क करणारे फलक होते. मात्र, आता कॉंक्रीटीकरण केल्यानंतर गतीरोधक आणि फलक बसविण्यात आलेले नाहीत. परिसरात वाहने वेगात चालवली जातात. यामुळे पादचाऱ्यांना तसेच वन्यजीवांनाही धोका निर्माण होत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai deer accident while crossing road in aarey mumbai print news ssb