मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर इमारतींची बांधकामे सुरू असून या बांधकामाच्या आजूबाजूला कचरापेटी दिसू नये यासाठी विकासक हे पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून कचरापेट्यांच्या जागा बदल्याच्या घटना मुंबईत वाढू लागल्या आहेत. गेल्याच आठवड्यात भायखळ्यात एका विकासकाच्या सांगण्यावरून कचरापेटीची जागा हलवल्याचे उघडकीस आले होते. आता घाटकोपरमध्येही अशीच घटना घडली आहे. कचरा पेटी हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारही होत असल्याची चर्चा आहे.
मुंबईकरांना कचरा टाकण्यासाठी जागा हवी असते पण ती आपल्या दारात नको असते. मुंबईत ठिकठिकाणी सध्या इमारतींचे बांधकाम सुरू असून या नव्याने बांधल्या जाणाऱ्या इमारतींच्या आसपास कचरापेटी असू नये यासाठी संबंधित विकासक थेट पालिकेच्या अधिकाऱ्यांना, अभियंत्यांना हाताशी धरून कचरापेटीची जागा बदलत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्याच आठवड्यात भायखळ्यात अशीच घटना घडली. भायखळा स्थानकाच्या समोरच मंदार निकेतन नावाची इमारत असून या इमारतीत डबेवाल्यांच्या संघटनेचे सुभाष तळेकर हे राहतात. त्यांनी याबाबत सांगितले की बस स्थानकाच्या बाजूला कचरा टाकण्याची जागा पूर्वी कधीही नव्हती. भायखळा स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या केळीगल्लीत पूर्वी कचरा टाकला जात असे. परंतु, तेथे एका इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून विकासकाच्या सांगण्यावरून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथले कचरा संकलन केंद्र बंद केले व इथे कचरा आणून टाकायला सुरुवात केली होती. मात्र आम्ही तक्रारी केल्यानंतर आता ही कचरापेटी पुन्हा एकदा आधीच्या जागेवर ठेवण्यात आल्याचे तळेकर यांनी सांगितले.
अशीच आणखी एक घटना घाटकोपरमध्ये घडली असून या प्रकरणी खासदार संजय दीना पाटील यांनी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या कचरापेटीमुळे परिसरातील नागरिकांना तिथे कचरा टाकता येत होता. आता अचानक जागा बदलल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचा आरोप दीना पाटील यांनी केला आहे. स्थानिक नागिकांद्वारे मिळालेल्या माहीतीनुसार विकासकाला फायदा होईल, या हेतूने कचरापेटी हटविण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई घ.क.व्य. विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने विकासकाच्या फायद्यासाठी, महापालिकेची दिशाभूल करून करण्यात आली आहे असा आरोप खासदार संजय पाटील यांनी केला आहे.
कचरा पेटी हटवण्यासाठी लाखोंचा व्यवहार ?
या प्रकरणात कचरापेटी हटवण्यासाठी लाखोंचा व्यवहार झाल्याची परिसरात चर्चा आहे. यामध्ये पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील एक अभियंता, विकासक आणि दोन कथित पत्रकार यांनी संगनमताने ही कचरापेटी हटवण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. विभाग कार्यालयाच्या मागच्या गल्लीत असलेली कचरापेटी कार्यालयाच्या जवळ आणून ठेवण्याचे कारस्थान या अभियंत्याने केल्याचे बोलले जात आहे. मात्र खासदारांनी तक्रार केल्यानंतर कचरापेटी पूर्ववत आधीच्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळेही पुन्हा एकदा वाद झाला असून कचरापेटी हटवण्यासाठी विकासक दबाव आणत असल्याचीही चर्चा आहे.
अभियंत्यावर कारवाईची मागणी
या प्रकरणात विकासकाला लाभ मिळवून देण्याच्या हेतूने अधिकारांचा गैरवापर करण्यात आला आहे. ही कृती केवळ बेकायदेशीरच नव्हे तर सार्वजनिक हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे कार्यालयीन चौकशी करून दोपीविरुद्ध महापालिका अधिनियमानुसार शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी व अधिकारांचा दुरुपयोग व फसवणूक करणाऱ्या अदिकाऱ्यांविरुद्ध ज्ञापन जारी करून संबंधितावर बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा (शिस्त व अपील) नियमे २०१५ अन्वये कारवाई करण्यात यावी., अशी मागणी संजय पाटील यांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचा विकासक आणि अधिकारी यांच्यातील संगनमत रोखण्यासाठी स्पष्ट आदेश व मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात यावीत, अशीही सूचना त्यांनी केली आहे.
दरम्यान, एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी हे आरोप फेटाळले आहेत. जसवंत राय मेहता उद्यानाच्या बाजुच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने एन विभाग कार्यालयाच्या मागे तात्पुरत्या स्वरुपात कचरापेटी स्थलांतरीत करण्यात आल्या होत्या. कचरापेटी पुर्ववत करण्याकरीता स्थानिक रहिवाश्यांची पत्रे प्राप्त झाली होती. तसेच घाटकोपर पूर्वकडून पश्चिमेला जाण्याकरीता वाहनांचा मोठा प्रमाणात सदर रस्त्यावर वापर होत असतो. त्यामुळे वाहतुकीस होत असलेला अडथळा पाहता सदर कचरा पेट्या हटविणे आवश्यक होते. कचरापेटया आता पूर्ववत करण्यात आल्या असून यातसार्वजनिक हिताचा भंग झालेला नसुन फक्त जनतेला चांगल्या प्रकारे सुविधा मिळावी हाच उद्देश होता, असे बेल्लाळे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. तर लवकरच या परिसराचा अभ्यास करून कचरा संकलनाची पर्यायी व्यवस्था देता येते का हे तपासण्यास सांगितले असल्याचेही बेल्लाळे यांनी सांगितले.