मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्याचा निर्णय ३० सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यासुनार ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अकरावी प्रवेशाची अंतिम फेरी हाेणार असून, विद्यार्थी, पालक, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

राज्यामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत १० फेऱ्या राबविण्यात आल्या आहेत. मात्र मराठवाडासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अकरावी प्रवेशाची अतिरिक्त फेरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ पर्यंत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणीसह प्राधान्यक्रम भरणे, तसेच प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे. या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची व नोंदणीची सुविधा अंतिमतः देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी केल्यानंतर मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने दिली.

राज्यातील एकूण ९ हजार ५४४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी तब्बल १४ लाख ८८ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाख ४३ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ पूर्ण करून सहभाग नोंदवला. प्रवेशाच्या दहाव्या आणि अंतिम फेरी अखेरीस १३ लाख ४२ हजार ४३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निश्चित झाले आहेत. हे प्रमाण ९९.८८ टक्के असून उरलेल्या दोन हजार विद्यार्थ्यांसाठी ही फेरी होणार आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ही अंतिम फेरी असून यानंतर संधी मिळणार नाही. अधिक माहितीसाठी मंडळाचे अधिकृत पोर्टल-https://mahafyjcadmissions.in ला भेट द्यावी अथवा ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in किंवा मदत क्रमांक ८५३०९५५५६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.