मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) एचडीआयएल – पंजाब – महाराष्ट्र को ऑप. (पीएमसी) बँक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणात आठ आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. गैरव्यवहारातील रकमेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेत जमीन खरेदी केल्याप्रकरणाशी संबंधित आरोपपत्र असून नुकतीच विशेष न्यायालायने त्याची दखल घेऊन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएल समूहाचे प्रवर्तक राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान, पीएमसी बँकेचे तत्कालीन संचालक जॉय थॉमस व इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. गैरव्यवहारातील ८२ कोटी ३० लाख रुपयांतून २०१० ते २०१३ या कालावधीत या ४१३ जमिनी खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे.
देवगड तालुक्यातील विजयदुर्ग गावात ही मालमत्ता आहे. तपासात २०१० ते २०१३ या कालावधीत एचडीआयएलचे प्रवर्तक सारंग वाधवन आणि राकेश वाधवन यांनी या गैरव्यवहातून मिळालेल्या रकमेतील ८२ कोटी ३० लाख रुपये विजयदूर्ग येथील ३९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले होते. त्यासाठी दोन उप कंपन्यांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर सारंग वाधवन यांनी कर्मचाऱ्याशी संगनमत करून कमिशन व इतर लाभांच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या जमिनी एचडीआयएल समूहाच्या कंपनीच्या नावे हस्तांतरित केल्या होत्या. त्यासाठी रोख रकमेचाही वापर करण्यात आला. या जमिनीची खरी किंमत केवळ ५२ कोटी ९० लाख रुपये होती.
एचडीआयएल ग्रुप कंपनीच्या नावाने पॉवर ऑफ ॲटर्नी बनवण्यात आली, असा आरोप आहे. बंदरांच्या विकासासाठी या जमिनी कथितपणे संपादित करण्यात आल्या होत्या. पण त्याचा विकास होऊ शकला नाही. ईडीने याप्रकरणात आतापर्यंत ७७२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. हे या प्रकरणातील तिसरे पुरवणी आरोपपत्र असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.