मुंबई : देशभरात २०२२ मध्ये एक लाख ९३ हजार ३८५ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२१ च्या तुलनेत त्यात सुमारे ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गंभीर बाब म्हणजे ५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर सर्वाधिक आर्थिक गुन्ह्यांची मुंबईत नोंद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : विवाहित प्रेयसीचे अश्लील छायाचित्र काढून १७ लाखांची खंडणी उकळली; आरोपी प्रियकराला अटक

भारतामध्ये २०२० पासून दाखल करण्यात आलेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशात २०२० मध्ये एक लाख ४५ हजार ७५४ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. पुढील वर्षी, म्हणजे २०२१ मध्ये एक लाख ७४ हजार १३ गुन्हे नोंदवण्यात आले. तर, २०२२ मध्ये एक लाख ९३ हजार ३८५ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात फसवणूक, फौजदारी विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी देशभरात एकूण चार लाख ११ हजार ७५२ आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता.

देशातील महानगरांचा विचार केल्यास आर्थिक गुन्ह्यांबाबत मुंबई आघाडीवर आहे. एकटय़ा मुंबईत २०२२ मध्ये सहा हजार ९६० आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे सहा हजार १५ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. ५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचा विचार केल्यास मुंबई दुसऱ्या तर दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी या प्रकारचे मुंबईत १० तर दिल्लीत १२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये राज्यांत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. राज्यात ५० कोटी अथवा त्यापेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे सर्वाधिक म्हणजे २० गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी पाच गुन्ह्यांमध्ये फसवणुकीची रक्कम १०० कोटींपेक्षा अधिक असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai has register highest incidence of financial fraud case zws