स्नेहल आंबेकर यांची मुक्ताफळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘महापौर बोलल्या की वृत्तपत्रांची विक्री वाढते’ अशी मुक्ताफळे उधळत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला पुन्हा एकदा अडचणीत आणले. महापौरांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केल्यानंतर शिवसेनेचा एकही सदस्य त्यांच्या मदतीला धावून गेला नाही.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. यावेळी महापौर स्नेहल आंबेकर पीठासीन अधिकारी होत्या. त्या वेळी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी महापौरांना कोपरखळी मारली.

स्थायी समितीत महापौर आल्यात, पण काहीच बोलत नाहीत. त्या गप्प आहेत. त्या बोलल्या तर तात्काळ बातम्या होतात, असा शालजोडीतील टोला प्रवीण छेडा यांनी हाणला आणि सभागृहात हास्याची लकेर उमटली. स्नेहल आंबेकर यांनाही स्वत:ला आवरता आले नाही, स्मितहास्य करीत त्या पटकन उत्तरल्या, हो, महापौर बोलल्या की वृत्तपत्रांची विक्री वाढते.

महापौरांच्या या उत्तरामुळे शिवसेनेचे नगरसेवक गांगरले. पुन्हा  वाद निर्माण होणार अशी चिन्हे निर्माण झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai mayor snehal ambekar statement on publicity