मुंबई : दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकांवरील ३० मेट्रो स्थानकांतील ६८ हजार १६६ चौरस फूट जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) घेतला आहे. या जागा विविध कंपन्या, संस्थांना उपलब्ध करण्यासाठी एमएमएमओसीएलने स्वारस्य निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. लवकरच निविदा अंतिम करून या जागा पात्र निविदाकारांना दिल्या जाणार आहेत. तिकिटाव्यतिरिक्त इतर पर्यायांद्वारे महसूल मिळविण्याच्या उद्देशाने एमएमएमओसीएलने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांच्या संचलन – देखभालीची जबाबदारी एमएमएमओसीएलवर आहे. या दोन्ही मार्गिकांना सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता हळूहळू या मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्या वाढू लागली आहे. दररोज अंदाजे तीन लाखांहून अधिक प्रवासी या मार्गिकांवरून प्रवास करीत आहेत. आता या मार्गिकांतून तिकिटाव्यतिरिक्त इतर पर्यायाद्वारे महसूल मिळविण्यासाठी एमएमएमओसीएलने या दोन्ही मार्गिकांवरील स्थानकांची जागा व्यावसायिक वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एमएमएमओसीएलने नुकत्याच स्वारस्य निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.
दोन्ही मार्गिकांवरील ३० स्थानकांमध्ये एकूण ६८,१६६ चौरस फूट व्यावसायिक जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. यात ४७२ किऑस्क आणि २५ ब्लॉक स्पेसचा समावेश आहे. एकूण ५७५ पैकी ४९७ किऑस्क आता परवाना प्राप्त करण्यासाठी उपलब्ध आहेत. किऑस्कसाठी परवाना कालावधी ५ वर्षांचा, तर ब्लॉक स्पेससाठी १५ वर्षांचा परवाना कालावधी असणार आहे. जागेच्या व्यावसायिक वापरातून एमएमएमओसीएलला महसूल मिळणार आहेच, पण त्याचवेळी प्रवाशांना आवश्यक त्या सुविधाही स्थानकांवर उपलब्ध होणार आहेत. या व्यावसायिक जागा मिळविण्यासाठी निविदा सादर करण्यास १६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून २९ ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांना निविदा सादर करता येणार आहेत.
स्थानकानुसार किऑस्क व ब्लॉक जागा उपलब्धता
- आरे – १८ उपलब्ध (१,२४५ चौ.फूट)
- आकुर्ली – २० उपलब्ध (१,४०१ चौ.फूट)
- आनंद नगर – ११ उपलब्ध (६७७ चौ.फूट)
- अंधेरी पश्चिम – ४७ उपलब्ध (११,६८२ चौ.फूट)
- बांगूर नगर – १४ उपलब्ध (२,६१८ चौ.फूट)
- बोरिवली पश्चिम – ११ उपलब्ध (२,७९१ चौ.फूट)
- डहाणूकरवाडी – १२ उपलब्ध (२,६९१ चौ.फूट)
- दहिसर पूर्व – ११ उपलब्ध (७२४ चौ.फूट)
- देवीपाडा – ३९ उपलब्ध (२,९९५ चौ.फूट)
- दिंडोशी – २२ उपलब्ध (१,४७६ चौ.फूट)
- एकसर – १५ उपलब्ध (२,८८८ चौ.फूट)
- गोरगाव पूर्व – १९ उपलब्ध (१,२४६ चौ.फूट)
- गोरगाव पश्चिम – १४ उपलब्ध (२,५२२ चौ.फूट)
- गुंदवली – ७ उपलब्ध (४९० चौ.फूट)
- जोगेश्वरी पूर्व – १७ उपलब्ध (१,०७२ चौ.फूट)
- कांदरपाडा – ११ उपलब्ध (२,४७७ चौ.फूट)
- कांदिवली पश्चिम – १२ उपलब्ध (२,१०७ चौ.फूट)
- कुरार – २० उपलब्ध (१,३४७ चौ.फूट)
- लोअर मालाड – १२ उपलब्ध (२,९४५ चौ.फूट)
- लोअर ओशिवरा – १२ उपलब्ध (२,९९६ चौ.फूट)
- मागाठाणे – १७ उपलब्ध (१,२९० चौ.फूट)
- मालाड पश्चिम – ६ उपलब्ध (२,३०० चौ.फूट)
- मंडपेश्वर – ११ उपलब्ध (२,६७७ चौ.फूट)
- मोगरा – २२ उपलब्ध (१,४५२ चौ.फूट)
- ओशिवरा – १४ उपलब्ध (२,९४३ चौ.फूट)
- ओवरीपाडा – २१ उपलब्ध (१,४२७ चौ.फूट)
- पोईसर – १८ उपलब्ध (१,२३७ चौ.फूट)
- राष्ट्रीय उद्यान – २० उपलब्ध (१,३६२ चौ.फूट)
- शिंपोली – १२ उपलब्ध (२,४६५ चौ.फूट)
- वळनाई – १२ उपलब्ध (२,६२० चौ.फूट)
- एकूण: ४९७ किऑस्क/ब्लॉक, एकूण ६८,१६६ चौ.फूट उपलब्ध