वर्तकनगर भागात सोमवारी दुपारी एका रिक्षा चालकाने शाळेतून घरी परतत असलेल्या १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी त्या रिक्षाचालकास अटक केली आहे. सुनील तिवारी (३५) असे रिक्षाचालकाचे नाव असून तो कोलशेत भागात राहतो. वर्तकनगर परिसरात पिडीत मुलगी राहत असून ती याच परिसरातील शाळेत शिकते. दुपारी ती बहिणीसोबत शाळेतून घरी परतत  असताना पोखरण रोडवरील एका कंपनीजवळ रिक्षामध्ये बसलेल्या सुनीलने तिला आत ओढले आणि तिचा विनयभंग केला.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार
कल्याण : पूर्वेकडे राहणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीशी ओळख करून घेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या संतोष पावरा (२३, रा. काटेमानीवली) याला कोळसेवाडी पोलिसांनीअटक केली. खडेगोळवली येथे राहणारी ही  मुलगी  खासगी क्लासला जात होती.  तरूणीने संतोषशी संपर्क साधून आपला वाढदिवस असल्याचे कळविले. संतोष क्लासमध्ये आला व तेथे कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला.

महिलेची आत्महत्या
ठाणे : बाळकुम परिसर भागात रुणवाल गार्डन या इमारतीतील नीता भावेश शहा  या ५४ वर्षीय मनोरुग्ण महिलेने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मानसिकअस्वास्थ्यातूनच  तिने आत्महत्या केली असावी, असा  अंदाज कापूरबावडी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मुलासह महिलेची आत्महत्या
मुंबई : यशोदा होशियारसिंग राणा (२८) या महिलेने वसई खाडीपुलावरून आपल्या मुलासह उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला.  यशोदा हिच्या पर्समध्ये पोलिसांना चिट्ठी सापडली असून विकास राणा (५) असे मुलाचे नाव आहे. यशोदा नालासोपाऱ्याच्या लक्ष्मी छेडा मार्गावरील शुभम अपरटमेंटमध्ये रहात होती.

लाचखोरीप्रकरणी पोलिसाविरोधात आणखी एक तक्रार
पनवेल : खारघर शहरात फेरीवाल्यांकडून महिन्याला हप्तेखोरी करणाऱ्या दोन सहायक पोलीस अधिकाऱ्यांना लाचप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्यापैकी पोलीस अधिकारी दीपक बाळनाथ भिताडे याने लाच मागितल्याची तक्रार अजून एका फेरीवाल्याने दाखल केली आहे. भिताडे याची सोमवारी पोलीस कोठडीतून मुक्तता झाली होती. या प्रकरणी पुन्हा भिताडे याला अटक होणार आहे. भिताडे याने मोमोज ही खाद्यपदार्थाची हातगाडी लावण्यासाठी महिन्याला ५ हजार रुपयांची लाच २७ जानेवारीला सायंकाळी मागितल्याचे पीडित फेरीवाल्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.