मुंबई- नजीकचे भाडे नाकाणाऱ्या, तसेच वेगवेगळी कारणे सांगून ग्राहकांशी वाद घालणार्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. मागील १५ दिवसात मुंबई वाहतूक पोलिसांनी ४८ हजार चालकांविरोधात ई चलन कारवाई करण्यात आली आहे. त्यातून ४० लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत काही मुजोर रिक्षाचालकाविरुद्ध विविध तक्रारी ग्राहकांकडून वाहतूक पोलिसांना प्राप्त झाले होते. विविध रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानकासह इतर ठिकाणी रिक्षाचालक लांबपल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी बऱ्याच वेळा नजीकचे भाडे नाकारतात. ग्राहकांशी वाद घालून वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लघंन करतात.
अनेक रिक्षाचालक गणवेश घालत नाहीत. त्यामुळे बॅच नसतो. जादा प्रवासी घेतले जातात, अतिरिक्त भाड आकारून ग्राहकांची लुट करतात अशा तक्रारी सातत्याने पोलिसांकडे येत होत्या. त्या तक्रारींची वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत सर्वच वाहतूक पोलीस चौक्यांना अशा रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण शाखेने १८ एप्रिल ते २ मे अशी एकूण १५ दिवस विशेष मोहीम राबवली होती.
या मोहीमेअंतर्गत पोलिसांनी ४८ हजार ४१७ रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यात भाडे नाकारणार्या २८ हजार ८१४ जणांविरोधात, विना गणवेश वाहन चालविणार्या १ हजार १६४ तर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक करणार्या ६ हजार २६८ जणांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या १२ हजाक १७१ जणांविरोधातही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहीमेत आम्ही ४८ हजार ४१७ वाहनचालकांविरोधात कारवाई केली तसचे४० लाख २५ हजार ३५६ रुपये दंड स्वरूपात आकारण्यात आली अशी वाहतूक पोलिसांनी दिली. भाडे नाकारणार्या २८ हजार ८१४ रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
रिक्षा, टॅक्सी चालकांचे धाबे दणाणले
या कारवाईमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहे. ग्राहकांच्या तक्रारी वाढत असल्याने कुठलीही हयगय न करता कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. त्यामुळे वाहतूक यंत्रणा कारवाईसाठी सज्ज झाली होती. अनेक बेकायेदशीर रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी कारवाईच्या भीतीने पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. जर रिक्षा, टॅक्सी रस्त्यावर असेल तर त्यांनी कितीही अंतरासाठी प्रवाशांना घेऊन जाणे बंधनकारक आहे. मात्र चालकांना लांबचे भाडे अपेक्षित असल्याने ते नकार देत होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अशी कारवाई सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी सांगितले.