मुंबई : चित्रनगरी परिसरात जेसीबीच्या मदतीने पुन्हा झाडे तोडली जात असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही जून महिन्यातही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली होती. गोरेगाव पूर्व येथील चित्रनगरी परिसरातील काही भागात मागील दोन आठवड्यापासून पुन्हा झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे. संबंधित परिसर हा पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांतर्गत येतो. अशा क्षेत्रांमध्ये कोणतेही बांधकाम, खोदकाम किंवा झाडांची तोड कायद्याच्या परवानगीशिवाय करता येत नाही. मात्र, तरीदेखील पुन्हा एकदा झाडे तोडली जात असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.

दरम्यान, रॉयल सिने एशिया फिल्म्स या कंपनीला चित्रनगरी महामंडळाने सल्तनत व्हॅली येथील जागा चित्रिकरणासाठी दिलेली आहे. ही जागा चित्रनगरीची असून सध्या या परिसरात स्टुडिओचे काम सुरू असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हा स्टुडिओ चित्रनगरीचा आहे. त्याचे बांधकाम संबंधित कंपनी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक…

यापूर्वी या परिसरात ६ जूनपासून जमीन साफ करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर तेथील झाडे तोडण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप स्थानिक आदिवासींनी केला होता. या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आदिवासी स्थानिकांना रोखण्यासाठी खासगी पुरुष व महिला बाऊन्सर नेमण्यात आले आहेत, असा आरोप पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिकांनी केला होता.

पोलीसांकडून सहकार्य नाही

याप्रकरणी स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमींनी पोलिसांशी संपर्क साधला असता स्थानिक तसेच पर्यावरणप्रेमींनी पोलिसांकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याचे सांगितले. यापूर्वीही पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगण्यात आले होते.

या कामासाठी आम्ही वृक्षतोडीची परवानगी घेतलेली आहे. हा परिसर चित्रनगरीचाच असून तेथील स्टुडिओचे बांधकाम संबंधित कंपनीला देण्यात आले आहे. नियमानुसार वृक्षतोड केल्यावर त्याची भरपाई म्हणून आम्ही इतरत्र झाडेही लावणार आहोत. पंकज चव्हाण, जनसंपर्क अधिकारी, दादासाहेब फाळके चित्रनगरी

मागील दोन आठवड्यांपासून चित्रनगरी परिसरात वृक्षतोड केली जात आहे. यापूर्वीही हा प्रकार घडला होता. ही जागा तेथील स्थानिक आदिवासींची आहे. ते तेथे शेती करतात. कोणतीही परवानगी नसताना वृक्षतोड केली जात आहे. संजीव वल्सन, पर्यावरणप्रेमी, सेव्ह आरे कार्यकर्ता