मुंबई : भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात अर्थात राणीच्या बागेत २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन प्रथमच भरविण्यात येणार आहे. बोन्साय म्हणजेच भल्या मोठ्या झाडांचे कुंडीत लावलेले लहान स्वरुप पाहण्याची संधी यामुळे मुंबईकरांना मिळणार आहे. तर कागदापासून विविध वस्तूंच्या प्रतिकृती तयार करण्याची अप्रतिम अशी ओरिगामी कलाकुसरही यानिमित्ताने पाहता येणार आहे. या दोन्हीही जपानी कला मुंबईकरांना राणीच्या बागेत पाहता येतील
बृहन्मुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला मिळेल. दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर या तीनही दिवसात हे कला प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. या प्रदर्शनात जपानी संस्कृतीतील सूक्ष्म व संयमशील कलांचे दर्शन मुंबईकरांना घडणार आहे. या कला प्रदर्शनासाठी बोन्साय स्टडी ग्रुप ऑफ द इंडो-जॅपनिज असोसिएशन व ओरिगामी मित्र यांचे सहकार्य लाभणार आहे.
‘बोन्साय’ या लघुवृक्ष संवर्धन कलेसोबतच ‘ओरिगामी’ म्हणजेच कागदाच्या घड्या घालून नवनवीन कलाकृती साकारण्याची पारंपरिक जपानी कला या प्रदर्शनात अनुभवता येणार आहे. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
बोन्साय म्हणजे काय
बोन्साय ही जपानी कलाकृती असून छोट्या कुंडीत लावलेल्या मोठ्या झाडांचे लहान स्वरुप यामध्ये बघायला मिळते. बोन म्हणजे भांडे आणि साय म्हणजे झाड या जपानी शब्दांपासून हा शब्द तयार झाला आहे. यामध्ये झाडांची छाटणी आणि विशेष तंत्रज्ञान वापरून मोठ्या झाडाची सजीव अशी लहान प्रतिकृती तयार केली जाते. झाडाला एका र्मयादित जागेत लहान आणि कलात्मक आकारात वाढवण्याची ही पद्धत आहे. शहरीकरणामुळे जागेची कमतरता असताना ही झाडे घरातही लावता येतात.
ओरिगामी कलेतील गणपती …
कागदाला कोणतीही कात्री न लावता, म्हणजेच कागद न कापता किंवा न चिकटवता कागदापासून कलाकृती साकारल्या जातात. कागदाच्या घड्या घालून वस्तू बनवण्याची ही एक जपानी कला आहे. या कलेत साध्या कागदापासून अत्यंत क्लिष्ट अशा प्रतिकृती, वस्तूही तयार करता येतात. राणीच्याबागेतील प्रदर्शनात ओरिगामीतील गणपतीही बघता येणार आहे.
