मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या ३ किमी अंतरावरील उलवे परिसरात मांस विक्री आणि प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याची तक्रार पर्यावरण प्रेमींनी मागील महिन्यात केली होती. या तक्रारीची दखल घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळाच्या हद्दीत होत असलेली मांस विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत. विमानविषयक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा दावा करून पर्यावरणप्रेमींनी ही तक्रार केली होती. मांस विक्रीमुळे परिसरात कावळे, घारी आदी पक्षी आकर्षित होत असल्याचे पर्यावरणप्रेमींनी तक्रारीत नमूद केले होते.

कोणत्याही विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करू नये असा नियम आहे. तसेच एअरड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समितीच्या (एईएमसी) नियमावलीतही विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल करू नये या नियमाचा समावेश आहे. असे असतानाही नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीपासून ३ किमी अंतरावरील उलवे परिसरातील सेक्टर १९ येथे प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री केली जात आहे. यामुळे नागरी विमान वाहतूकविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला होता. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या बी. एन. कुमार यांनी २४ फेब्रुवारी रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन डीजीसीएच्या हवाई सुरक्षा शाखेने मार्च महिन्यात चौकशी सुरू केली होती. ही तक्रार डीजीसीएअंतर्गत एअर सेफ्टी संचालक ए. एक्स. जोसेफ यांच्याकडे पाठवण्यात आली होती.

कावळे, घार आदी पक्षी आकर्षित

मांस विक्री केल्यामुळे या परिसरात कावळे, घार यासह विविध पक्षी आकर्षित होतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधीबरोबरच इतर पक्ष्यांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे स्वच्छतेचे सर्व नियमही धाब्यावर बसवले जात आहेत.

बर्ड फ्लूचा धोका

उरण तालुक्यातील चिरनेर येथे जानेवारी महिन्यात कुक्कुटपालकाच्या कोंबड्या बाधित होऊन मृत झाल्या होत्या. मृत, आजारी, निरोगी दिसणारे पाळीव पक्षी त्याचप्रमाणे गिनी टर्की बदकाचे मांस, विष्ठा, अंडी आदी महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचबरोबर दहा किमी परिसर बर्ड फ्लू सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या परिसरात योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत पर्यावरप्रेमींनी व्यक्त केले आहे. तसेच स्चच्छता आणि इतर सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.