लोकल प्रवासावर अखेर सरकारने नवे निर्बंध लादले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकलमध्ये गर्दी करु नका. शक्यतो वर्क फ्रॉम होम करा असे आवाहन आणि विनंती सरकारकडून वारंवार करण्यात आली होती. मात्र आता लोकल प्रवासावर रविवारपासून निर्बंध लादण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती दिली आहे.
काय आहेत लोकल प्रवासावरचे निर्बंध?
लोकल स्थानकांवर विशेष पथकं तैनात केली जाणार
अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय इमर्जन्सी असल्यासच लोकल प्रवास करु दिला जाणार
लोकल ट्रेनचा अनावश्यक वापर होतो आहे ते टाळण्यासाठी हे निर्बंध लादले गेले आहेत
२२ मार्च मध्यरात्रीपासून ते पुढील सुचना मिळेपर्यंत हे निर्बंध लागू केले जाणार आहेत
आयकार्ड पाहून लोकल स्थानकांवर प्रवेशासाठी परवानगी दिली जाणार, अन्यथा प्रवास करण्यास बंदी घातली जाणार
प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेशद्वारांवर पथकं नेमली जाणार
१ GRP, १ राज्य पोलीस, महसूल विभागाचा एक प्रतिनिधी आणि एक वैद्यकीय प्रतिनिधी यांचा या पथकात समावेश असणार
रेल्वे स्थानकावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पोलिसांनी चौकशी करावी. सदर व्यक्ती ही अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहे याची खात्री करावी. त्यासाठी शासकीय ओळखपत्र किंवा अत्यावश्यक सेवा नियुक्ती आदेश तपासावा. वैद्यकीय सेवेच्या तात्काळ आवश्यकतेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही खात्री करावी हे नियुक्त करण्यात आलेल्या पथकाचे मुख्य कर्तव्य असणार आहे असंही विभागीय आयुक्तांनी म्हटलं आहे.
ज्या व्यक्तींना रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला आहे त्या व्यक्तींची पथकातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करावी. त्यामध्ये कोणतीही प्रतिकूल बाब आढळली तर सदर व्यक्तीस अलगीकरण कक्षात पाठवावे.
ज्या प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वेने बाहेर गावी जायचे आहे त्यांच्या तिकिटाची तपासणी करुन त्यांना रेल्वे स्थानकावर प्रवेश द्यावा. असंही विभागीय आयुक्तांनी म्हटलं आहे.