तोटय़ात चाललेल्या बेस्टच्या परिवहन विभागाला सावरण्यासाठी नवीन डय़ुटी पद्धत नक्कीच फायद्याची आहे. ही पद्धत कर्मचाऱ्यांसाठी अजिबातच अन्यायकारक नाही. तरीही कर्मचाऱ्यांचे काही आक्षेप असल्यास त्यांनी प्रशासनाशी चर्चा करावी. गैरहजर आंदोलन करून प्रवाशांना वेठीला धरणे योग्य नाही. असे प्रकार प्रशासन यापुढे खपून घेणार नाही, असे परखड मत बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी बेस्ट समिती सभेत व्यक्त केले. १ जूनपासून लागू होणाऱ्या नव्या डय़ुटी शेडय़ुलमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास कमी होणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
१ आणि २ एप्रिल रोजी बेस्टच्या वाहक आणि चालकांनी अचानक गैरहजर आंदोलन केले. त्यामुळे लाखो प्रवाशांची गैरसोय झाली. कर्मचाऱ्यांचे हे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे गुप्ता यांनी सांगितले. त्यासाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गैरहजर म्हणून नोंदवून त्यांचा दोन दिवसांचा पगार कापणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. पूर्वमंजुरीने रजा घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर मात्र कारवाईचा बडगा उचलला जाणार नाही. याबाबतचा ठराव बेस्ट समितीच्या सभेत मांडण्यात आला.
नव्या डय़ुटी शेडय़ुलला न्यायालयानेही मान्यता दिली आहे. सध्याच्या डय़ुटी शेडय़ुलमध्ये कर्मचारी १२-१२ तास काम करत आहेत. मात्र या नव्या शेडय़ुलप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास दहावरच येणार आहेत. तरीही कर्मचारी संघटनांना याबाबत आक्षेप असल्यास त्यांनी प्रशासनासह चर्चा करायला हवी, असे ते म्हणाले. या वेळापत्रकानंतर कर्मचाऱ्यांना दहा तासांच्या वर डय़ुटी, दर दिवशी वेगळे मार्ग मिळणार नाहीत, याची खातरजमा बेस्टने करायला हवी, असे समिती सदस्य सुहास सामंत यांनी सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्यास त्याचा विपरित परिणाम सेवेवर होऊ शकतो, असे मत समिती सदस्य रंजन चौधरी यांनी व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New time table for best employees