राज्याच्या उर्वरित भागात पोहोचलेल्या थंडीने मुंबईला वगळले असून गेला आठवडाभर किमान तापमानाचा पारा चढताच राहिला आहे. पुढील दोन दिवस यात फारसा फरक पडणार नसला तरी ३० डिसेंबरपासून उत्तरेत नव्याने येणाऱ्या थंडीच्या लाटेचा प्रभाव मुंबईत येऊन थडकला तर नववर्षांचे स्वागत गुलाबी थंडीत होऊ शकेल.  
अवघा महाराष्ट्र थंडीने कुडकुडत असला तरी मुंबईकरांना गुलाबी थंडीचेच अधिक कौतुक असते. गेला आठवडाभर किमान तापमानाने उसळी घेतली असली, तरी कोरडय़ा हवेमुळे मुंबईकर घामापासून मुक्त आहेत. मात्र नववर्षांच्या स्वागताला सज्ज होताना एकीकडे गुलाबी थंडीची वाट पाहिली जात आहे. गेल्या दहा वर्षांतील किमान आठ नववर्षांच्या पहाटी गुलाबी थंडीत अवतरल्या असल्याने मुंबईकरांच्या अपेक्षांना अनुभवाचीही किनार आहेच. सध्याची हवामानाची स्थितीही त्याला पूरक आहे. १५ डिसेंबर रोजी पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला होता. गेल्या दहा वर्षांतील डिसेंबरमधील हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी तापमान होते. मात्र त्यानंतर पाऱ्याने चढाई कायम राखली. रविवारी, २८ डिसेंबर रोजी किमान तापमान १७.४ अंश से. राहिले. सोमवारीही त्यात फारसा फरक होणार नसल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
दरम्यान उत्तर भारतात बर्फ व धुक्याचे साम्राज्य पसरले असून, ३० जून रोजी पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे थंड वारे थडकण्याचा अंदाज दिल्ली येथील वेधशाळेने वर्तवला आहे. यावेळी वाऱ्यांची दिशा उत्तरेकडून राहिल्यास तसेच समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी राहिल्यास मुंबईतील तापमानाचा पारा घसरू शकतो, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्याने सांगितले. जानेवारीच्या सुरुवातीच्या आठवडय़ात हवा अधिक थंड होण्याचा गेल्या काही वर्षांतील अनुभव पाहता यावेळीही गुलाबी थंडीची अपेक्षा करण्यास हरकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

थंडीच्या कडाक्याने पुणेकर गारठले
पुणे :शहरात थंडीचा कडाका वाढल्यामुळे नागरिक  गारठले आहेत. येत्या चोवीस तासांत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. शहरात किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमान सरासरीच्या खाली आल्यामुळे संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना हुडहुडीचा सामना करावा लागत आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडय़ात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान दहा अंशांच्या जवळ आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमान २५ अंशांपर्यंत खाली आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year welcome with pink cold