शैलजा तिवले
करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या महिनाभरात जवळपास ६० टक्के घट झाली आहे. मात्र दिवाळीमुळे होणारी गर्दी तसेच हिवाळ्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
राज्यात ऑगस्टमध्ये दर आठवडय़ाला आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या जवळपास ७० ते ८० हजार होती, तर मृत्युदर दोन ते तीन टक्क्यांदरम्यान होता. गणेशोत्सवानंतर राज्यातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढून सप्टेंबरमध्ये दर आठवडय़ाला सरासरी १ लाखांहून अधिक बाधितांची नव्याने भर पडत होती. रुग्णसंख्या वाढूनही मृत्युदर दोन ते अडीच टक्क्यांपर्यंत स्थिर होता. ऑक्टोबरमध्ये मात्र रुग्णसंख्येत झपाटय़ाने घट झाली आहे. दर आठवडय़ाला नव्याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या ५० हजारांपर्यंत खाली आली आहे. तर मृतांची संख्याही निम्म्याने कमी झाली आहे.
रुग्णसंख्या सध्या कमी असली तरी नोव्हेंबर महिना आव्हानात्मक असणार आहे. थंडी आणि दिवाळी यामुळे रुग्णसंख्या वाढू शकते. तसेच मुंबईत बाहेरून येणाऱ्यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक सतर्क झालो आहोत, असे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
पुढच्यास ठेच मागचा सावध
युरोप, अमेरिकेत आलेली दुसरी लाट ही पुढच्यास ठेच मागचा सावध याप्रमाणे आपल्याला सतर्कतेचा इशारा देणारी आहे. अशी लाट आपल्याकडे येईलच याबाबत ठोसपणे सांगता येणार नाही. रुग्णसंख्या वाढीचा धोका लक्षात घेऊन त्यानुसार पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
हिवाळ्यात संसर्गाचा धोका अधिक
रुग्णसंख्या कमी झाल्याने करोनाची पहिली लाट संपण्याच्या टप्प्यात आहे. मात्र हिवाळ्यात या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक आहे. अमेरिका, फ्रान्स, नेदरलँड या देशांमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत थंडी हा देखील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशात थंडी त्या तुलनेत कमी असली तरी तापमान साधारण १० अंश सेल्सिअस खाली येते, त्या भागांमध्ये मात्र विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यासह तापमानात घट होणाऱ्या भागात संसर्गाचा धोका हिवाळ्यात वाढणार असल्याचे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील तिसऱ्या आठवडय़ाच्या रुग्णसंख्येची स्थिती
रुग्णसंख्या मृत्यू मृत्युदर(टक्के)
सप्टेंबर १,३३,१६१ २९७५ २.२३
ऑक्टोबर ५२,६४० ११८७ २.२५
गणेशोत्सवाच्या काळात लोकांचा वाढलेला वावर आणि प्रतिबंधात्मक उपायांच्या वापराकडे दुर्लक्ष यामुळे सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढल्याचे आपण अनुभवले आहे. आता शिथिलीकरण मोठय़ा प्रमाणात होत असल्याने येणाऱ्या दिवाळीमध्ये लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा नागरिकांनी मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर व हात स्वच्छ धुणे ही त्रिसुत्री पाळणे गरजेचे आहे.
– डॉ. अविनाश सुपे, मृत्यू लेखापरीक्षण समितीचे प्रमुख