२६/११ खटल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडलीचा गौप्यस्फोट
२००४ मध्ये गुजरात येथे कथित पोलीस चकमकीत ठार झालेली मुंब्रा येथील १९ वर्षीय तरुणी इशरत जहाँ ही ‘लष्कर-ए-तोयबाची (एलईटी) दहशतवादी होती आणि संघटनेच्या महिला संघटनेची सदस्य होती, असा गौप्यस्फोट २६/११च्या खटल्यात माफीचा साक्षीदार बनलेला पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याने गुरुवारी विशेष न्यायालयासमोर केला.
बाबरी मशीद पाडल्याचा सूड म्हणून भारतातील मंदिरांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता आणि गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावरील हल्ला हा त्याचा भाग होता, असा खुलासाही हेडलीने केला. २६/११च्या हल्ल्यासंबंधित खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. एस. सानप यांच्यापुढे सुरू आहे. खटल्यातील माफीचा साक्षीदार म्हणून हेडलीची ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे साक्ष नोंदवण्यात येत आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भारतातील दहशतवादी कारवायांबाबत हेडलीला विचारणा केली त्या वेळेस त्याने इशरत जहाँ प्रकरण आणि अक्षरधाम हल्ल्याबाबत खुलासा केला. ‘एलईटी’मध्ये दहशतवाद्यांची भरती करणाऱ्या विभागाचा प्रमुख मुझम्मिल बट, संघटनेचा म्होरक्या झकी-उर रहमान लख्वी यांच्या मुझफ्फराबाद येथे झालेल्या बैठकीला आपणही उपस्थित होतो. तेव्हा लख्वीने मुझम्मिलला भारतातील दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न फसल्याबाबत विचारणा केली होती. हल्ल्याच्या कटातील दहशतवाद्यांना पोलिसांनी चकमकीत ठार केले. हल्लेखोरांमध्ये एक महिला होती आणि तीही पोलिसांच्या चकमकीत ठार झाली. ती भारतीय नागरिक होती आणि ‘एलईटी’ची दहशतवादी होती, असा खुलासा हेडलीने केला. त्या महिलेचे नाव इशरत असल्याचे हेडलीने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे प्रकरण?
मुंब्रा येथील १९ वर्षांच्या इशरत जहाँसह जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई, अमजदअली अकबरअली राणा आणि झीशान जोहा अशा चौघांना गुजरात पोलिसांनी १५ जून २००४ रोजी अहमदाबाद येथील चकमकीत ठार केले होते. हे चौघेही ‘एलईटी’चे दहशतवादी होते आणि गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ठार करण्यासाठी ते दाखल झाले होते, असा दावा अहमदाबादच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केला होता. गुजरात उच्च न्यायालयाने या चकमकीच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाकडून तपासाची सूत्रे सीबीआयने हाती घेतली. तसेच ही बनावट चकमक होती व साहाय्यक गुप्तहेर विभाग आणि अहमदाबाद गुन्हे अन्वेषण विभागाने ही चकमक घडवून आणली होती, असा आरोप करत सीबीआयने २०१३ मध्ये याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.
या दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचा दावा
साजीद मीर आणि मुझम्मिल बट यांच्यासह अबू दुजाना, अबू ऐमन, अबू अल काहफा, ‘एलईटी’च्या नौदल विभागाचा प्रमुख अबू याकूब, ‘एलईटी’च्या महसूल विभागाचा प्रमुख हाजी अश्रफ, अब्दुल अजीज, अब्दुल अनस, अल-काईदाच्या ‘३१३ ब्रिगेड’चा प्रमुख इलियास काश्मिरी, कॅप्टन खुर्रम या सगळ्यांशी भारतातील दहशतवादी कारवायांबाबत संवाद साधल्याची कबुलीही हेडलीने दिली.

माझी मुलगी निर्दोष आहे आणि हे सत्य ईश्वरालाही ठाऊक आहे. सीबीआयनेही तिला निर्दोष ठरविल्यामुळे ती चकमकही बोगस होती. डेव्हिड हेडली हा एक एजंट असल्यामुळे तो काय खरे बोलणार.
– इशरतची आई

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One woman from let named ishrat jahan was involved what headley disclosure means