मुंबई : सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्सोवा – दहिसर दरम्यानच्या विस्तारासाठी कांदिवलीमधील स्थानिकांनी लावलेल्या ३०० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याबाबत पालिकेने झाडांवर नोटीस लावली होती. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला असून स्थानिक रहिवाशांनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध केला आहे.मुंबईच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत झटपट पोहोचता यावे यासाठी सागरी किनारा रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी- वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंतचा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) उभारण्यात आला आहे.

दरम्यान, सागरी किनारा मार्गाच्या वर्सोवा – दहिसर या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामासाठी कांदिवलीमधील चारकोप परिसरातील ३०० हून अधिक झाडे तोडण्यात येणार आहेत. चारकोप सेक्टर ८ मधील अनेक झाडांवर पालिकेने याबाबत नोटीस लावली आहे. ही नोटीस पाहून रहिवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही. या नोटीसांमध्ये सागरी किनारी मार्गाच्या विस्तारीकरणासाठी झाडे तोडण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच यापैकी २२८ झाडांचे पुर्नरोपण करण्यात असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, तोडण्यात येणारी झाडे गेल्या अनेक वर्षांपूर्वी लावण्यात आली आहेत. त्यामुळे ही झाडे पुर्नरोपण करणे शक्य नाही, असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले.

चारकोप परिसर दाट खारफुटींनी वेढलेला आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक रहिवाशांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे येथील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच स्थानिक रहिवाशांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली आहे. यामुळे या परिसरातील झाडे तोडण्यास स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. दरम्यान, बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी यासंदर्भात संबंधित व्यक्तींशी चर्चा केली. तसेच जास्तीत जास्त झाडे तोडली जाणार नाहीत यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिल्याचे पर्यावरणप्रेमी मिली शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

गेली अनेक वर्ष ही झाडे परिसरात तग धरून आहेत. कोणतीही कल्पना न देता अचानक झाडे तोडण्यात येणार असल्याचे समजले. याचबरोबर इतक्या मोठ्या झाडांचे पुर्नरोपण करणे कसे शक्य आहे. आतापर्यंत आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहत होतो. ही झाडे तोडल्यास ओसाड रानमाळावर राहत असल्यासारखे वाटेल. मिली शेट्टी, पर्यावरणप्रेमी