जंकफूडचे अतिसेवन, संतुलित आहाराचा अभाव असल्याचे स्पष्ट
जंकफूडचे अतिसेवन आणि संतुलित आहाराचा अभाव यामुळे पालिका शाळेत बालकांमध्ये कुपोषण किंवा कमी वजन यासोबतच आता स्थूलतेचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. तसेच अंगणवाडीमध्ये पोषण आहार सुरू असूनही गेल्या पाच वर्षांत कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण जवळपास १८ टक्के असे स्थिर राहिले असल्याचे प्रजाच्या अहवालातून स्पष्ट होते.
शहरातील पालिका शाळा आणि अंगणवाडीमधील बालकांच्या आरोग्याचा अहवाल प्रजाने मंगळवारी प्रकाशित केला. पालिका शाळेमध्ये या वर्षी प्रथमच स्थूल बालकांची नोंद करण्यात आली आहे. शहरामध्ये एकूण १,४२१ बालके लठ्ठ वर्गवारीत आढळली असून यातील सर्वाधिक बालके ही ताडदेव, नाना चौक, गॅ्रण्ट रोड, मलबार हिल या भागांमधील आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक कमी वजनाची बालके आढळलेल्या परळ, शिवडी, नायगाव या भागांत अधिक प्रमाणात स्थूल बालकांचीही नोंद झाली आहे. त्याचबरोबर शहरातील अंधेरी (पश्चिम), मुलुंड (पूर्व), दादर, माहीम, शिवाजी पार्क, धारावी, विद्याविहार, घाटकोपर या विभागांतील शाळांमध्ये अधिक प्रमाणात स्थूल बालके असल्याचे अहवालातून समोर आले आहे. पालिका शाळांमधील कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरला असून या वर्षी ते प्रमाण ३.३ टक्के आहे. २०१४ पासून वयानुसार वजन मोजण्याऐवजी उंचीनुसार बालकाचे वजन मोजण्याची जागतिक आरोग्य संघटनेची पद्धती अवलंबल्याने गेल्या काही वर्षांमध्ये कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी दिसत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
मात्र त्याच वेळी अंगणवाडीमधील बालकांचे वजन हे वयाच्या प्रमाणातच मोजले जाते. दोन प्रशासनाने वेगवेगळ्या पद्धतींमुळे नोंद केल्याने कमी वजनाच्या बालकांची नेमकी आकडेवारी पुढे येण्यात अडथळा येत असल्याचे या अहवालातून प्रजाने मांडले आहे.
या अहवालानुसार, शहरातील अंगणवाडीत १७ टक्के बालके कमी वजनाची असून यातील २,७१३ बालके अत्यंत कमी वजनाची आहेत. २०१४ पासून यातील सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या सुमारे अडीच ते तीन लाख बालकांना पोषण आहार दिल्याची नोंद आहे.
मात्र तरीही कमी वजनाच्या बालकांच्या प्रमाणाचा काटा हा २०१४ पासून जवळपास १७ ते १८ टक्क्य़ांवर स्थिर राहिला आहे. मालवणी, मानखुर्द, मुलुंड (पूर्व), खार, सांताक्रूझ या भागांमध्ये सर्वाधिक कमी वजनाच्या बालकांची संख्या नोंदली गेली. याशिवाय पालिकेच्या बालकांमध्ये पोषण आहाराच्या कमतरतेमुळे जीवनसत्त्व अ, क, ब यासह मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
पूरक आहार योजनेचा निधी पडून
पालिका शाळेमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह जेवणाव्यतिरिक्त पूरक आहार देण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात या वर्षी पालिकेने केली होती. याअंतर्गत बालकांना चणे, शेंगदाणे देण्यात येणार होते; परंतु याची निविदा प्रक्रियाच रखडल्याने अर्धे वर्ष संपत आले तरी तरतूद केलेल्या निधीतील एकही रुपया पालिकेने अद्याप खर्च केलेला नाही असे नमूद करत बालकांच्या आरोग्याबाबत पालिकेच्या हलगर्जीकडे प्रजाच्या प्रकल्प अधिकारी जेनिफर यांनी लक्ष वेधले.
अहवालातील शिफारशी
- पालिका शाळेतील सर्व बालकांची तपासणी होणे आवश्यक असून पूर्वप्राथमिकच्या बालकांचीही तपासणी करावी
- पालिका शाळांप्रमाणे खासगी शाळांमधील बालकांचीही दरवर्षी आरोग्य तपासणी होणे गरजेचे
- माध्यान्ह भोजन आणि मुलांचा डबा यामध्ये सकस आणि संतुलित आहार असण्यावर भर द्यावा
- सकस आहार, व्यायाम याबाबत पालकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता
मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे बालकांचा मृत्यू
२०१७ मध्ये शहरात ० ते १९ वयोगटातील ४३७ बालकांचा क्षयरोगाने, तर १०९ बालकांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे, तर पोषण आहाराच्या कमतरतेमुळे ३२ बालकांना जीव गमवावा लागला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे बालकांमध्येही मधुमेह, उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढले असून २०१७ मध्ये १६ बालकांचा मधुमेहाने आणि १० बालकांचा उच्च रक्तदाबाने मृत्यू झाल्याचे नोंदले गेले.
नगरसेवक आणि आमदारांचे मात्र दुर्लक्ष
शहरातील बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न नगरसेवक आणि आमदारांना मात्र तितका महत्त्वाचा वाटत नाही. पोषण आहाराबाबत या वर्षभरात केवळ ४ नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, तर २०१७ आणि २०१८ च्या अधिवेशनामध्ये ११ प्रश्न आमदारांनी विचारले होते.
