मुंबईः हाजी अली दर्ग्याच्या कार्यालयात दूरध्वनी करून बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याविरोधात ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये कोणी आल्यास त्याला गोळ्या घालण्यात येतील, अशी धमकी आरोपीने दिली होती. याप्रकरणी सार्वजनिक आगळीक निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव पवन असल्याचे सांगितले. प्राथमिक तपासात हा दूरध्वनी दिल्लीवरून आल्याचा संशय असून याप्रकरणी ताडदेव पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई : चाकूने हल्ला करून लुटणाऱ्या आरोपींना १२ तासांत अटक

हाजी अली दर्ग्याचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर शेख (४२) यांच्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (२), ३५२, ३५३ (२), ३५३ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मंगळवारी व बुधवारी दोन धमकीचे दूरध्वनी आरोपीने केले होते. त्यासाठी दोन वेगवेगळ्या मोबाइलचा वापर करण्यात आला होता. पण दूरध्वनी करणारी व्यक्ती एकच असल्याचे शेख यांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने प्रथम २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास तक्रारदारांच्या मोबाइलवर दूरध्वनी केला होता. संकेतस्थळावरून त्याने शेख यांचा मोबाइल क्रमांक मिळवल्याचा संशय आहे. आपण दिल्लीवरून पवन बोलत असून हाजी अली दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवला आहे. दर्गा लवकरात लवकर रिकामा करा.

हेही वाचा >>> Medha Somaiya Defamation Case : संजय राऊत यांना न्यायालयाचा अंशत: दिलासा, 30 दिवसांसाठी….

दर्गा खाली न केल्यास बॉम्बने उडवून देण्यात येईल, असे आरोपीने धमकावले. तसेच मध्ये कोणी आल्यास त्याला गोळी मारून ठार करण्यात येईल, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने धमकावले. त्यानंतर पुन्हा आरोपीने दूरध्वनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हाजी अली परिसरात तपासणी करण्यात आली असून कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. दोन्ही दूरध्वनी करणारी व्यक्ती एकच असून त्याने आपले नाव पवन असल्याचे सांगितले. तसेच शेख यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शेख यांनी बुधवारी ताडदेव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. ताडदेव पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखाही याप्रकरणी समांतर तपास करीत आहे. आरोपी दिल्लीतील रहिवासी असल्याचा संशय असून दोन्ही मोबाइल क्रमांक पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्याच्या माध्यमातून तपास सुरू आहे. पोलिसांनी हाजी अलीला भेट देऊन सुरक्षेची पाहणी केली असून कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police registered case for threat call of planted bomb in haji ali dargah office mumbai print news zws