मुंबई : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमिवर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी मुंबईत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. देशाच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी चुनाभट्टी व मालवणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील एका प्रकरणात चुनाभट्टी पोलिसांनी २० वर्षीय तरूणाला अटक केली आहे. कुर्ला परिसरातील तरूणाने इन्स्टाग्राम पोस्टवर भारताविरोधी पोस्ट ठेवल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १५२,१९७(२), ३५३ १(ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
२० वर्षीय तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी स्वतः याप्रकरणी तक्रार केली आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आरोपी तरूणाने भारतविरोधी पोस्ट इन्स्टाग्रामवर ठेवली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी रात्री उशीरा चुनाभट्टी पोलिसांनी कुर्ला येथील राहत्या परिसरातून या तरूणाला अटक केली. अटक करण्यात आलेला २० वर्षीय तरूण शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मालाड येथे २६ वर्षीय तरूणाच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५३(२) अंतर्गत गुन्हा मोबाइल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरूण केबल नेटवर्कचा व्यवसाय करतो. शनिवारी तो व्हॉट्सअॅप स्टेटस बघत असताना एका ब्यूटी पार्लरच्या नावाने सेव्ह केलेल्या क्रमांकावर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरविरोधात स्टेटस ठेवले होते. तसेच विरोधी हावभाव करणारे इमोजी ठेवले होते. भारतात राहून देशाविरोधात कृती केल्याबाबत याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मोबाइल क्रमांकाद्वारे आरोपीचा शोध सुरू आहे.
५ हजार पोस्ट हटवल्या
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षासंदर्भात खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या समाज माध्यमांवरील सुमारे पाच हजार पोस्ट्स हटवण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागातील अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली होती. समाज माध्यमांवरील लष्कराच्या हालचाली, रणनीती आणि शेजारील देशांकडून संभाव्य कारवाईबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबरने खोटी माहिती आणि अफवा पसवणाऱ्यांना इशारा दिला आहे. तसेच अशा माहितीवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
… तर गुन्हा दाखल होऊ शकतो
खोटी माहिती जाणूनबुजून किंवा अनवधानाने पसरवणे हा संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने नागरिकांना माहितीचा दुसऱ्याला देताना संयम राखण्याचा आणि सखोल विचार करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांच्या बाबतीत भारत सरकार अधिकृत संवाद माध्यमे आणि प्रमाणित स्रोतांचा वापर करून राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण विषयक निवेदने, अद्यतने प्रसिद्ध करते. नागरिकांनी अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा आणि अप्रमाणित संदेश, चित्रफिती किंवा प्रतिमा पुढे पाठविणे किंवा त्यांचे समर्थन करणे टाळावे, त्यामुळे सामाजात संभ्रम निर्माण होण्याचा किंवा चुकीच्या माहितीचा प्रसार होण्याची शक्यता असते. सर्व नागरिकांना जबाबदारीने वागावे, अधिकृत स्त्रोतांकडून सत्यता तपासावी आणि कोणतीही संशयास्पद किंवा दिशाभूल करणारी सामग्री आदींबाबत त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.