मुंबई: चौथ्या थरावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या पवई येथील गोखले नगर गोविंदा पथकातील एक गोविंदाचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आनंद दांडगे (२६) असे या मृत गोविंदाचे नाव असून तो पवईच्या गोखले नगर परिसरात राहत होता. त्याच परिसरातील गोखले नगर गोविंदा पथकात अनेक वर्षांपासून तो कार्यरत होता. तो १६ ऑगस्ट रोजी, दहीहंडीच्या दिवशी विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात पथकाकडून सात थर लावण्यात आले होते. त्यात चौथ्या थरावरून खाली पडून तो गंभीर जखमी झाला होता.
आनंदच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून त्याच्यावर कन्नमवार नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी दोनच्या सूनरास त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर पवईत शोककळा पसरली असून विक्रोळी पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे.
यंदा दहीहंही फोडताना २९४ गोविंदा जखमी झाले होते, तर दोघांचा मृत्यू झाला होता. मुंबई-ठाण्यात उंच दहीहंडी फोडण्यासाठी थर रचण्यात गोविंदा पथके व्यग्र असतानाच उत्सवाला गालबोट लागले. मानखुर्द परिसरात बाल गोविंदांसाठी दहीहंडी बांधणाऱ्या एका गोविंदाचा पडून मृत्यू झाला. तर अंधेरी येथील गोविंदा पथकासोबत गेलेल्या १४ वर्षाच्या मुलाची टेम्पोमध्ये शुद्ध हरपली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यापूर्वी सरावादरम्यान एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
सुरक्षा साधने नाहीत
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या छोट्या आयोजकांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र यातील काही आयोजकांनी सुरक्षेसंदर्भात सूचनांचे पालन केले नव्हते. गोविंदा पथकांनी खाली मॅट अंथरली असली तरी काहींनी वरच्या थरावरील गोविंदासाठी दोरीची व्यवस्था केली नसल्याचे आढळले, तर काही ठिकाणी मॅट आणि दोरीची व्यवस्था नव्हती. यंदा अनेक छोट्या आयोजकांकडून सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे आढळून आले.
अनेक गोविंदा जायबंदी
दरवर्षी मुंबईसह राज्यभर होणाऱ्या दहीहंडी उत्सवामध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. विविध ठिकाणी उंच मानवी मनोरे रचून लाखोंची बक्षिसे पटकावण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगते. मात्र मानवी मनोऱ्यांचा हा रोमहर्षक थरार अनेक गोविंदासाठी जीवघेणा ठरला आहे. तर काहींच्या पदरी कायमस्वरूपी अपंगत्व आले असून अंथरुणाला खिळून राहायची वेळ आली आहे.