मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या राज्यव्यापी दौऱ्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमधील वजनदार नेत्यांवर आक्रमक टीका सुरू केली आहे. त्या- त्या भागातील नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची राज ठाकरे यांची खेळी असल्याचे जाणकारांचे मत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेऊन राज्यव्यापी दौरा सुरू केल्यानंतर राज ठाकरे यांनीही तेथेच जंगी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केले. खास करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला, तर कोकणात खेड येथील सभेत काँग्रेसचे नेते व उद्योगमंत्री नारायण राणे यांचा समाचार घेतला. कोकणातील मराठी माणसांच्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घातल्या जात आहेत, त्याबद्दल त्यांनी राणे यांना जबाबदार धरले. राणे हे कोकणातील वजनदार नेते मानले जातात. त्यामुळेच त्यांनी राणे यांच्यावर नेम साधला. जलसंपदा गैरव्यवहार प्रकरणी सुनील तटकरे वा मुलामुलींच्या लग्नात शाही भोजनावळी घालणाऱ्या भास्कर जाधव यांना मात्र त्यांनी महत्व दिले नाही.
सोलापूरमध्ये केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर अगदी सनक्कल टीकेची झोड उठविताना तोंडून बाहेर पडणाऱ्या असभ्य शब्दांचीही त्यांनी फिकीर केली नाही. मोठय़ा नेत्यांवर टीका करीत प्रसिद्धीही दणकून मिळवायची आणि त्यांच्या मतदारांमध्येच संभ्रम निर्माण करायचा, अशी राज यांची ही व्यूहरचना आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याही अशाच टोलेजंग सभा व्हायच्या, त्यांच्या काही शब्दांवर अशाच शिटय़ा आणि टाळयांचा धुमाकूळ व्हायचा, निवडणुकीत मतपरिवर्तनासाठी मात्र त्यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही. बाळासाहेबांसारखाच सभांचा साज आणि भाषणांचा बाज ठेवणाऱ्या राज ठाकरे यांना निवडणुकीत त्याचा फायदा होईल का, याबद्दल मात्र राजकीय जाणकारांमध्येच मतभिन्नता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2013 रोजी प्रकाशित
वजनदार नेत्यांवर शरसंधान..
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या राज्यव्यापी दौऱ्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमधील वजनदार नेत्यांवर आक्रमक टीका सुरू केली आहे.
First published on: 25-02-2013 at 02:56 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Powerful leaders target