Pratap Sarnaik Buys First Tesla Model Y Car : उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी ‘टेस्ला’ने अलीकडेच भारतात त्यांचं पहिलं शोरूम सुरू केलं आहे. या शोरूममधून कंपनीने त्यांची पहिली कार विकली आहे. टेस्लाच्या भारतातील शोरूममधून पहिली कार शिवसेनेच्या (शिंदे) एका मंत्र्याने खरेदी केली आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टेस्लाची भारतातील पहिली मॉडेल वाय कार खरेदी केली आहे.
टेस्ला मॉडेल वाय कार खरेदी केल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “मी ही कार घेऊन आनंदी झालो आहे. टेस्लाची इलेक्ट्रिक कार मुंबईत लॉन्च झाली आहे आणि ती घेण्याची मला संधी उपलब्ध करून देण्यात आली. आपल्या राज्यातील रस्त्यांवर अशा इलेक्ट्रिक कार कशा येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पुढील १० वर्षांमध्ये अशा असंख्य गाड्या रस्त्यांवर यायला हव्यात असं माझं मत आहे. आमचं सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचंही तेच म्हणणं आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना सरकारचं प्रोत्साहन : सरनाईक
राज्याचे परिवहन मंत्री म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतू, समृद्धी महामार्गासह प्रत्येक ठिकाणी सूट देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनं बनवणाऱ्या कंपन्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. इलेक्ट्रिक वाहनं पुढील १० वर्षांमध्ये आपल्या राज्यात क्रांती घडवून आणतील. या वाहनांना प्रोत्साहन मिळावं हीच आपल्या पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यासाठी आपलं राज्य शासन काम करतंय.”
सरनाईकांनी टेस्ला कार नातवाला भेट दिली
प्रताप सरनाईक म्हणाले, “टेस्ला ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीच्या मुंबईतील शोरूमचं उद्घाटन केलं आहे. ही चांगली कार आहे. या कंपनीची पहिली कार खरेदी करण्याचा मान मला मिळाला. देशातील पहिली टेस्ला कार महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याच्या मालकीची आहे याचा मला अभिमान आहे. ही कार मी माझ्या नातवाला भेट देतोय. ही कार घेऊन त्याला शाळेत पाठवलं जाईल. त्यावेळी इतर मुलं ही कार पाहतील. इतर मुलांमध्ये जनजागृती होईल. जे लोक कार खरेदी करू शकतात ते अशा इलेक्ट्रिक कार्सना प्राधान्य देतील.”