टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा प्रियकर राहुल राज सिंग याच्याविरोधात मंगळवारी मुंबईच्या बांगुरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रत्युषाचे आई-वडील आणि मित्रांचा जबाब नोंदविल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राहुल राज सिंगवर कलम ३०६, कलम ३२३ आणि ५०६ कलमातंर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणे, धमकावणे आणि मारहाणीचा आरोप ठेवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, राज सिंगची प्रकृती बिघडल्याने त्याला याअगोदरच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुलच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल डॉक्टरांनी जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये राहुलची प्रकृती अद्यापही ठीक नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
प्रत्युषाने स्वत:हून आत्महत्या केली नसून तिला प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला होता. प्रत्युषा-राहुल राहत असलेल्या घरापासून अवघ्या पाच मिनिटांवर महापालिकेचे सिद्धार्थ रुग्णालय आहे. तिथे प्रत्युषाला नेण्याचे सोडून राहुलने तिला थेट २५ किलोमीटर लांब अंधेरीच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात का नेले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या वेळी गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला जे सुचले ते केले, असे राहुलने सांगितल्याचे कळते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratyusha banerjee suicide boyfriend rahul raj singh booked for abetment charges